ॠतू हे काळाचाच भाग आहेत. सुरूवातीला काळ विभागणी कशी असते याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. अहोरात्र ( दिवस + रात्र ) , पक्ष, मास, ॠतू, अयन, वर्ष अशी आपल्याला आवश्यक एवढी विभागणी जाणून घेणे इष्ट होईल.

अहोरात्र : ४ प्रहाराचा दिवस आणि ४ प्रहरांची रात्र अशी आठ प्रहरांची मिळून एक अहोरात्र होते.

पक्ष : पंधरा अहोरात्र म्हणजे एक पक्ष होय. पंधरा दिवस म्हणजे एक पक्ष असणा-या या कालमापनात कृष्ण आणि शुक्ल असे दोन पक्ष आहेत.

मास : दोन पक्षांचा मिळून एक मास / एक महिना होतो. ३० अहोरात्रींचा एक मास. शुक्ल पक्षातील १५ अहोरात्र व कृष्ण पक्षातील १५ अहोरात्र या क्रमाने एक मास होतो. चैत्र, वैशाख, मार्गशीर्ष, पौष, श्रावण इ. असे एकुण १२ महिने आहेत.

ॠतू : बारा महिन्यातील २-२ महिन्यांचा एक असे एकुण सहा ॠतू असतात. त्यांची विभागणी अशी –

  1. हेमंत ॠतू = मार्गशीर्ष + पौष मास
  2. शिशिर ॠतू = माघ + फाल्गुन मास
  3. वसंत ॠतू = चैत्र + वैशाख मास
  4. ग्रीष्म ॠतू = ज्येष्ठ + आषाढ मास
  5. वर्षा ॠतू = श्रावण + भाद्रपद मास
  6. शरद ॠतू = आश्विन + कार्तिक मास

अयन : सहा महिने किंवा तीन ॠतू मिळून एक अयन होते. अशी दोन अयने आहेत.

  • उत्तरायन : शिशिर, वसंत आणि ग्रीष्म या तीन ॠतूत सूर्य उत्तरेकडे सरकत जातो. याला उत्तरायन किंवा आदान काळ असे म्हणतात.
  • दक्षिणायन : वर्षा, शरद आणि हेमंत या तीन ॠतूत सूर्य दक्षिणेकडे सरकत जातो. याला दक्षिणायन किंवा विसर्ग काळ असे म्हणतात.

वर्ष : दोन अयन / सहा ॠतू / बारा महिने मिळून एक वर्ष होते.

या कालगणनेशी ओळख करून देण्याचा उद्देश त्या त्या ॠतूत होणारे बाह्य सृष्टीतले बदल व त्यानुसार आपण करावयाचे आहार विहारातील बदल समजून घेणे सोपे व्हावेत हा आहे. आणि त्यानिमित्ताने मराठी महिन्यांच्या नावांची उजळणी होईल.

ॠतूनुसार आहार विहारात योग्य ते बदल करणे यालाच ॠतूचर्या असे म्हणतात. तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने पुढे दिलेली ॠतूचर्या निरोगी व्यक्तींनी अवश्य पाळावी.

१) हेमंत ॠतूचर्या : मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजेच हेमंत ॠतू होय.

हेमंतातील आहार : ॠतू प्रभावानए भूक वाढते म्हणून तिचे शमन होण्यासाठी व शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी तेल, तूप इ. स्निग्ध द्रव्यांत केलेले, तसेच गोड, आंबट व खारट चवीचे पदार्थ अन्नात जास्त प्रमणात ठेवावेत. जलीय प्राण्यांचे मांस किंवा पाणथळ जागी राहणारे प्राणी यांचे मांस योग्यरित्या शिजवून व खाण्यायोग्य करून खावे. गुळ, नवीन तांदूळ, दुधाचे पदार्थ, तेल इ. पुष्टीदायक व पचनास जड असणारा आहार या काळात खाण्यास हरकत नाही.

हेमंतातील विहार : व्यायाम करणे, अंगास ऊटणे लावणे, शरीरास वाफ घेणे (स्वेदन), उन्हात बसणे, शौचासाठी व इतर सर्व कामांसाठीही गरम पाणीच वापरावे. झोपण्यासाठी जमिनीत किंवा गुहेत ( तळमजला / तळघर ?) बिछान्याजवळ शेगडी, गरम निखा-यांसह ठेवून झोपावे. उष्ण द्रव्यांचा अंगावर लेप करून गरम, उबदार प्रावरण घेऊन गार वा-याचा स्पर्श होऊ न देता झोपावे.

२) शिशिर ॠतूचर्या : माघ व फाल्गुन या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजेच शिशिर ॠतू.

या ॠतूतही आहार विहार हा हेमंत ॠतू प्रमाणेच असावा. कारण या ॠतूतले हवामान व बाह्य परिस्थिती ही हेमंताप्रमाणेच असते. गारवा असतो. किंबहुना तो जरा अधिक प्रमाणात असतो. या ॠतूत भूक चांगलीच वाढलेली असते. ती शमविण्यासाठी वरच्यासारखाच पोषक आहार घ्यावा व शरीर पुष्ट, प्रतिकारक्षम बनवावे.

३) वसंत ॠतू : चैत्र व वैशाख या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजे वसंत ॠतू होय.

वसंत ॠतू हा अतिशय आल्हाददायक असतो. सगळ्या ॠतूंचा राजा म्हणजे वसंत ॠतू. याच ॠतूत वसंतोत्सव, वसंत व्याख्यानमाला यासारखे सामाजिक कार्यक्रमही साजरे होतात. कारण हा काळच तसा आनंददायक, मन मोहरून टाकणारे असते. या ॠतूत सृष्टी बहरते, कोकिळेचे गान बहरते ते याच ॠतूत. अशा सुंदर ऋतूत सोबत वातावरणात उष्णता आल्याने, शरीरात थंडीच्या काळात साठलेला पण गारव्याने घट्ट असणारा, कफ पातळ व्हायला लागतो आणि मग सर्दी – खोकला – ताप असे कफाचे आजार सुरू होतात. (डॉक्टरांच्या भाषेत ‘सिझन सुरू झाला’) वसंत ॠतूत पंचकर्मांपैकी ‘वमन’ हा उपचार निरोगी अवस्थेत करवून कफ कमी करून घेणे फायदेशीर असते.

वसंतातील आहार : मध, जव आणि सामान्यतः आपण राहत असलेल्या प्रदेशातील (जांगल) प्राण्यांचे मांस, डाळिंबाचे सरबत, नागरमोथा – सुंठीचा काढा, मध + साधे पाणी (गरम पाणी नव्हे) यांचे सेवन करावे. परंतु पचनास जड असा आहार, दिवसा झोपणे, स्निग्ध पदार्थ, गोड व आंबट पदार्थ यांचे सेवन टाळावे.

वसंतातील विहार : गण्डूष (गुळण्या), नस्य, व्यायाम, उटणे लावणे, स्नान करून अंगास चंदन वगैरे द्रव्यांच लेप सुगंधासाठी लावावा. मनाला प्रसन्नता येईल अशा परिसरात उद्यानात, आवडीच्या विषयावर प्रियजनांबरोबर छान चर्चा करीत बसावे.

४) ग्रीष्म ॠतू : ज्येष्ठ व आषाढ या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजेच ग्रीष्म ॠतू होय.

ग्रीष्म ॠतूत पृथ्वी सूर्याच्या प्रखर तेजाने तापलेली असते. ह्या उन्हाळ्याच्या काळात नैऋत्य दिशेकडचा वारा आल्हाददायक व सुखावह असतो. या ॠतूतील ऊष्णतेचा परिणाम म्हणून प्राण्यांच्या शरीरातील स्निग्धता कमी होते. अतिशय घाम व अंतर्बाह्य ऊष्मा यामुळे तहान लागणे व अंगाची लाही होणे असे घडते.

ग्रीष्मातील आहार : मातीच्या नव्या भांड्यात ठेवलेले, सुवासिक, साखर घातलेले व थंड असे शरीराला / हृदयाला बळा देणारे पन्हे, सरबत असे पेय घ्यावीत. अन्नपदार्थसुद्धा गोड, पातळ, थंड असेच घ्यावेत. तांदूळ, दुध, तूप, द्राक्षे, नारळाचे पाणी, साखर हे जेवणात असू द्यावे.

ग्रीष्मातील विहार : तलाव, विहिरी, नद्या यात पोहणे, सुगंधी फुलांचा सुगंध दरवळतोय अशा ठिकाणी फिरणे, अंगावर पातळ कपडे घालणे इ. मनास आल्हाददायक अशा गोष्टी कराव्यात. घराचे अंगण, छत, गच्ची अशा ठिकाणी रात्री झोपावे. म्हणजेच नैसर्गिक गार हवेत झोपावे असा याचा अर्थ घ्यावा. येथे पंखा, ए.सी. यांचा वापर संयुक्तिक नाही.

५) वर्षा ॠतूचर्या : श्रावण व भाद्रपद या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजे वर्ष ॠतू होय.

वर्षा ऋतूत पश्चिमेकडील वारा वाहत असतो. पावसाच्या आगमनाने उल्हसित पक्ष्यांच्या ओरडण्याने पृथ्वी, आसमंत निनादून जातो. पाऊस, इंद्रधनुष्य, हिरवीगार धरा याने मन प्रसन्न असते. ग्रीष्माच्या उन्हाने त्रासलेले शरीर वर्षा ॠतूतील पाण्याने प्रफुल्लित होते. मात्र पाण्याचा जडपणा वाढलेला असतो आणि ते पचनाला जड होते. तसेच पचल्यावर आम्लविपाकी (पचनानंतर आंबटपणा येतो) होते. म्हणून अजुनच भूक मंदावते.

वर्षा ॠतुतील आहार : या ॠतूत होणारा वाताचा त्रास कमी करण्यासाठी “बस्ती” हे पंचकर्मातील एक कर्म करून घेणे खूपच उपयुक्त आहे. मूग, सुंठ घालून मुगाचे कढण, जुने तांदूळ, गहू, जव, कोंबडी – बोकड इ. प्राण्यांच्या मांसाचे सूप (मांसरस) अशा आहारद्रव्यांचा आहारात समावेश करावा. पावसाचे पाणी, विहिरीचे –तलावाचे पाणी उक्ळून, आटवून प्यावे. उकळोन आटवलेले पाणी त्याला मिळालेल्या उष्णतेच्या परिणामामुळे पचायला हलके होते व भूक वाढायला मदत होते, पचनास मदत करते. पाऊस, वारा जास्त असतांना हलके, तेल व तूप घातलेले गरम – आंबट चवीचे पदार्थ असलेले भोजन घ्यावे.

वर्षा ॠतूतील विहार : ज्या घरात जमिनीतून अथवा भिंतीतून ओल येत नाही व डास – उंदीर चावण्याचे भय नाही अशाच घरात उष्ण उआतावरण राहील असे करून रहावे. उटण लावणे, गरम पाण्याने स्नान करणे, सुगंधी व सुंदर फुले बाळगणे अशा पद्धतीने मन प्रसन्न व वातावरण आल्हाददायक करून रहावे. वर्षा ॠतूत नदीच्या पाण्यात जाऊ नये. दिवसा झोपू नये. मैथुन जास्त करू नये. पावसाचे पाणी अंगावर घेणे, जास्त पायी फिरणे, व्यायाम व सूर्याची किरणे अंगावर घेणे शक्यतो टाळावे.

६) शरद ॠतूचर्या : आश्विन व कार्तिक या दोन महिन्यांचा कालावधी म्हणजेच शरद ॠतू होय. यालाच आपण ‘ऑक्टोबर हिट’ असे म्हणतो.

या ॠतूत आकाश निरभ्र, शुभ्र असते. तांदळाच्या ओंब्या लागलेल्या असतात. आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणे प्रखर असतात. या प्रखर किरणांमुळे गारव्याने थंड झालेले मनुष्य-शरीर तापते व शरीरात पित्त वाढुन त्याचे त्रास जाणवू लागतात. मात्र तरीदेखिल वर सांगितलेले पथ्य जर वर्षा ॠतूत पाळलेले असतील तर शरद ॠतूत जास्ती त्रास होत नाहीत.

शरद ॠतूतील आहार : पित्ताचे त्रास टाळण्यासाठी कडू भाज्या भरपूर तूपात बनवून खाव्यात. या काळात विरेचन (औषधींच्या सहाय्याने जुलाब घेणे), रक्तमोक्षण (पूर्वकर्मे करून रक्त काढणे) ही पंचकर्मातील कर्मे फायदेशीर ठरतात. या काळात शीतल व पचनास हलकेच अन्न भोजनात घ्यावे. भोजन करण्याची इच्छा असेल तेव्हा, भूक सडकून लागल्यावर साठे साळी (साठ दिवसात पिकणारा तांदूळ), गहू, जव, मूग ही धान्ये, साखर, मध, द्राक्षे – काळ्या मनुका, पडवळ इ. खावे. पिण्यासाठी पाणी स्वाभाविक (सभोवतालच्या) उष्णतेने पचनास हलके झालेले असते. या काळात पाणी म्हणूनच चवीस गोड लागते. शरद ॠतूत अगस्ती ता-याचा उदय होतो, त्यामुळे पाणी अमृतासमान होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे.

शरद ॠतूतील विहार : गार पाण्यात डुंबावे, कानास गोड असे आवाज – गीत – पक्ष्यांचे आवाज ऐकावेत. शरीरावर पातळ वस्त्र घालावेत. अंगास सुगंधी औषधे – उदा. वाळा, चंदन, नागरमोथा इत्यादींचा लेप लावावा. फुलांचा सुगंध घ्यावा. चंद्राच्या निर्मळ, शीत किरणात रात्री वेळ व्यतीत करावा.

जास्त जेवण करणे, दही खाणे, उन्हात बसणे, क्षार (नमकीन पदार्थ), मध, दुपारी झोपणे, बर्फ खाणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात.

ॠतूचर्येचे महत्व स्वस्थ (निरोगी) आणि रोगी अशा दोन्ही अवस्थेत आहे. सध्या वातावरणात आणि ॠतूंमध्ये काही अनाकलनीय तर काही मानवीय चुकांमुळे बदल झालेले दिसतात. त्यानुसार आयुर्वेदात ग्रंथात सांगितलेल्या ॠतूचर्येत काही उपयुक्त बदल तज्ञाच्या सहाय्याने करवून घेऊन ॠतूचर्या पाळणे म्हणजे दुग्ध-शर्करा असाच योग होईल.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.