आजकाल कोणत्याही डॉक्टरांची पाटी पाहिली कि कुठल्यातरी रोगाचा तज्ञ, एखाद्या अवयवाचा तज्ञ ( मधुमेह तज्ञ, हॄदयरोग तज्ञ, मेंदूरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ ) अशा स्वरूपात ती पाटी असते. थोडक्यात आजकाल स्पेशिअँलिटी दिसून येते

आयुर्वेदातही आठ प्रकारचे विभाग पूर्वीच्या ॠषीमुनींनी वर्णन केलेले आहेत. या आठ विभागांना ‘अष्टांग आयुर्वेद’ असे म्हटले जाते.

  • कायचिकित्सा
  • बालचिकित्सा
  • ग्रहचिकित्सा
  • उर्ध्वांगचिकित्सा
  • शल्यचिकित्सा
  • दंष्ट्राचिकित्सा
  • जराचिकित्सा
  • वृष्यचिकित्सा

कायचिकित्सा : काय म्हणजे शरीर व या शरीराची चिकित्सा म्हणजे कायचिकित्सा. काय याचा दुसरा अर्थ अग्नि असाही होतो. शरीरातील अग्निची चिकित्सा म्हणजे कायचिकित्सा होय. जोपर्यन्त शरीरात अग्निअ आहे तोपर्यन्त जीवन आहे. अग्नि शांत झाला म्हणजेच मृत्यु आला असे समजले जाते.

बालचिकित्सा : शून्य ते सोळा वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना आयुर्वेद “बाल” / “बालक” समजतो. यांची जी चिकित्सा ती बालचिकित्सा होय. यामध्ये बालकांच्या चिकित्सेबरोबर बालकाचे पोषण करणा-या आईच्या दूधातील विकृतींवरही चिकित्सा वर्णन केलेली आहे.

ग्रहचिकित्सा : भूत, राक्षस, पिशाच्च यांची बाधा व त्यावर करायचे उपाय म्हणजे ग्रहचिकित्सा होय. वेगवेगळे मंत्र, होम, हवन, स्तोत्रपठण यांसारख्या उपायांचा यात समावेश होतो. दृष्ट काढणे वैगरे गोष्टींचाही यातच अंतर्भाव आहे.

ऊर्ध्वांगचिकित्सा : मानेच्या वरच्या भागातील रोगांची चिकित्सा म्हणजे ऊर्ध्वांग चिकित्सा होय. यात डोळ्यांचे रोग, तोंडाचे रोग, कर्ण रोग, डोक्याचे रोग, नाकाचे विकार यांचा समावेश होतो. सध्याच्या काळातील कान-नाक-घसा तज्ञ ही संकल्पना म्हणजे ऊर्ध्वांगचिकित्सा असे आपल्याला म्हणता येईल.

शल्यचिकित्सा : शरीराला जे पीडाकर, त्रास देणारे ते म्हणजे शल्य आणि ते बाहेर काढुन टाकण्याचे उपाय म्हणजे शल्यचिकित्सा होय. निरनिरळे गवत, काडी, दगड, लोखंडाचा तुकडा, हाडे, केस, नख, पू, खराब जखमा, अंतर्गर्भ ही व अशी अनेक शल्य आहेत. शस्त्रक्रिया (surgery), अग्निकर्म(cauterisation) , क्षारकर्म (chemotherapy?) याद्वारे यावर उपाय केला जातो. ही शल्यचिकित्सा होय.

दंष्ट्राचिकित्सा : वेगवेगळ्या विषारी प्राण्यांनी दंश केल्यावर त्यावर केले जाणारे उपाय म्हणजे दंष्ट्राचिकित्सा होय. कुत्रा, मांजर, साप, उंदीर, विंचू, विषारी वनस्पती आणि इतर विषे यांची बाधा झाल्यावर होणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय यांचे वर्णन दंष्ट्राचिकित्सेमध्ये केलेले आहे.

जराचिकित्सा : जरा म्हणजे म्हातारपण. वृद्ध व्यक्तींसाठी केली आणारी चिकित्सा किंवा वृद्धावस्था दूर ठेवण्यासाठी केली जाणारी चिकित्सा म्हणजे जराचिकित्सा किंवा रसायनचिकित्सा होय. शरीरातील वयोमानाप्रमाणे कमी होणारे बल टिकवून ठेवण्यासाठी, निरनिराळ्या रोगांमुळे नंतर आलेले दौर्बल्य दूर करण्यासाठी रसायन चिकित्सा केली जाते. या रसायन चिकित्सेमुळे दीर्घायुष्य, स्मरणशक्ती, आरोग्य, तारूण्य, शरीरकांती, वर्ण, उत्तमस्वर, उत्तम बल, वाचासिद्धी प्राप्त होतात.

वाजीकरण / वृष चिकित्सा : वाजी म्हणजे घोडा. घोड्याप्रमाणे शक्तीमान, उपभोगास समर्थ शरीर बनविणारी चिकित्सा ती वाजीकरण / वृष चिकित्सा होय. यामध्ये शुक्राचे बळ वाढविणे, नपुंसकत्व दूर व्हावे, आरोग्यपूर्ण निरोगी संतती होणे यादृष्टीने विचार करून चिकित्सा वर्णन केलेली आहे. ( सध्या इंजिनाची शक्तीही HP = Horse Power अशीच मोजली जाते हे विशेष.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.