वंशसातत्य टिकविणे हा प्रत्येक प्राण्याचा स्वभावधर्म आहे. आपल्यासारखीच आपली संतती व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो. एव्हढेच नाही तर ती संतती निरोगी, आरोग्यपूर्ण, संस्कारयुक्त, बलवान, बुद्धीवान असावी हाही आपला प्रयत्न असतो. या दृष्टीने आयुर्वेदाने खूप काही मार्गदर्शन केलेले आहे.

गर्भाशयात जेव्हा गर्भ वाढत असतो तेव्हा त्याचे पोषण हे आईने घेतलेल्या आहारापासूनच होत असते. म्हणुन गर्भिणी अवस्थेत आईचा आहार कसा असावा याविषयी आयुर्वेदात वर्णन आहे.

  • १) पहिला महिना – थंड दूध, पथ्यकर आहार.
  • २) दुसरा महिना – गोड औषधे टाकून उकळवून तयार केलेले दूध
  • ३) तिसरा महिना – दूधातून गाईचे तूप व मध.
  • ४) चौथा महिना – गाईचे पारंपारिक पद्धतीने काढलेले लोणी.
  • ५) पाचवा महिना – गाईचे पारंपारिक लोणकढी तूप
  • ६) सहावा महिना – गोड औषधे व पारंपारिक लोणी.
  • ७) सातवा महिना – सहाव्या महिन्याप्रमाणे
  • ८) आठवा महिना – तांदूळ, सातू व दूध एकत्र करून शिजवलेली पेज.
  • ९) नववा महिना – लोणकढी गाईचे तूप आणि वरील पेज, तसेच तेलाचे बस्ती घ्यावेत, योनीमार्गात तेलात भिजवलेले कापसाचे बोळे पिचु) ठेवावेत.

रोजच्या जेवणात या पदार्थांचा जास्तीतजास्त वापर केला म्हणजे तो आई व गर्भ दोघांनाहे उपयुक्त आणि पोषक ठरतो.

गर्भिणी अवस्थेतील नऊ महिने आईने कसे वागावे ? तिचे आचरण कसे असावे? याविषयी आयुर्वेदाने वर्णन केलेले आहे. पचायला जड पदार्थ, चमचमीत पदार्थ खाणे, अवघड – कठीण- व्यायामासारख्या हालचाली करणे, हादरे बसविणा-या वाहनातून प्रवास करणे, मनाला उबग आणणा-या गोष्टी, मलमूत्रांचे आलेले वेग रोखून धरणे, सतत उताणे झोपणे, मादक पेयांचे सेवन करणे, धूम्रपान करणे, मैथुन करणे, चोरी – व्देष – शोक – भय – क्रोध या गोष्टी गर्भिणी स्त्रीने कटाक्षाने टाळायला हव्यात.

आईच्या उदरात गर्भ वाढत असतांना गर्भाची वाढ त्या नऊ महिन्यांत कशी होते, कुठल्या महिन्यात कुठले अवयव तयार होतात ? याविषयीदेखिल आयुर्वेदात वर्णन आहे.

  • १) पहिला महिना – गर्भ हा बुडबुड्याच्या स्वरूपात असतो
  • २) दुसरा महिना – गर्भ हा घनीभूतून गोळ्यासारखा असतो.
  • ३) तिसरा महिना – गर्भाचे दोन्ही हातपाय, डोके हे पिंडक स्वरूपात दिसू लागतात.
  • ४) चौथा महिना – सर्व अवयव स्पष्ट दिसू लागतात. हॄदयाच्या हालचाली व्यक्त होऊ लागतात. या महिन्यात आई दोन हॄदयांनीयुक्त होते. एक स्वतःचे आणि एक बाळाचे हॄदय एकाच शरीरात असल्याने आईला या "दौहॄद्" म्हणजे दोन हॄदयांची असे म्हणतात. या काळात बाळाच्या इच्छा आईमर्फत व्यक्त होऊ लागतात. म्हणुनच या महिन्यात दौहॄद् म्हणजेच डोहाळे लागतात.
  • ५) पाचवा महिना – गर्भाचे मन पूर्णपणे विकसित आणि सक्रिय होते.
  • ६) सहावा महिना – गर्भाची बुद्धी व्यक्त होऊ लागते, बाळाला केस येतात.
  • ७) सातवा महिना – बाळाचे सर्व अंग – प्रत्यंग, अवयव पुष्ट होतात. या महिन्यात जन्मलेले बाळ जगू शकते.
  • ८) आठवा महिना – गर्भ व आई, दोघांचे ओज अस्थिर असते. ओज आईच्या शरीरात आले कि आई प्रसन्न होते आणि बाळ म्लान होते आणि ओज बाळाच्या शरीरात असले कि बाळ प्रसन्न होते आणि आई म्लान होते. ओज अस्थिर असल्याने आणि ओज हे प्राणस्वरूप असल्याने या महिन्यात प्रसूती होणे तितकेसे योग्य नाही. कारण त्यामुळे आई किंवा बाळ किंवा दोघेही यांना जीवाला धोका संभवतो.
  • ९) नववा महिना – या महिन्यात गर्भ स्वाभाविक प्रसवासाठी तयार असतो.

गर्भाची मासानुमासिक वाढ, सुप्रजा, निरोगी आणि गुणवान अपत्य प्राप्तीसाठी दर महिन्याला बदलणारी, वेगवेगळी औषधे वापरून सुलभ, नैसर्गिक प्रसूती व गर्भसंस्कार करता येतात. तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने नऊ महिने व्यवस्थित औषधोपचार घेऊन गर्भिणी अवस्था आणि प्रसूती निखळ आनंद देणारी होऊ शकते.

गर्भिणी अवस्थेत आई कोणता आहार घेते आहे ? यावरही बाळाला पुढे होणार आजार, पुढील आयुष्यातील त्रास कोणते ? याविषयीही सविस्तर माहिती आयुर्वेदात आहे.

गर्भिणीने पुढील पदार्थ नऊ महिने तर टाळावेतच पण प्रत्येकाने स्वतःच्या स्वास्थ्य रक्षणासाठीही ते टाळणे नेहेमीच उत्तम आहे. वेगवेगळे पदार्थ आणि त्यामुळे पुढील आयुष्यात गर्भाला होणारे त्रास असे –

  • १) अतिगोड पदार्थ – मुके, लठ्ठ, प्रमेही बालक.
  • २) अतिआंबट पदार्थ – त्वचारोग, नेत्ररोग विकारग्रस्त बालक.
  • ३) अतिखारट पदार्थ – अंगावर सुरकुत्या पडणे, लवकर टक्कल पडणे
  • ४) अतितिखट पदार्थ – प्रजोत्पादनास असमर्थ बालक.
  • ५) अतिकडू पदार्थ – कृश, शुष्क, बलहीन बालक.
  • ६) अतितुरट पदार्थ – काळ्या रंगाचे, पोटाच्या तक्रारी असणारे बालक.
  • ७) अतिमासे खाणे – डोळ्यांचे विकार असलेले बालक.
  • ८) मद्यप्राशन करणे – चंचल, स्मरणशक्ती कमी असणारे बालक.
  • ९) धूम्रपान करणे – गर्भिणीचा गर्भपात होऊ शकतो.

प्रसूती झाल्यानंतर सुमारे सव्वा महिन्यापर्यंतचा काळ म्हणजे 'सूतिका' काळ होय. या काळात सूतिका असणा-या स्त्रीने स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यामुळे प्रसूतीनंतर होणारे त्रास , आजार होणार नाहीत.

प्रसूती झाल्यानंतर पुढील गोष्टी अवश्य करायलाच हव्यात.

  • १) आश्वासन – गोड , प्रेमळ शब्दाने सूतिकेला धीर द्यावा.
  • २) स्नेहन, मर्दन – रोज अंगाला तीळ तेलाने किंवा औषधी तेलाने मालीश करावी.
  • ३) पट्टबंधन – पोटाला औशधी तेल लावून घट्ट पट्टा बांधावा. आजकाल हा प्रकार जुनाट, बाळबोध गोष्ट म्हणून टाळला जातो पण त्यामुळेच पुढे पोट सुटणे, पोटाच्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • ४) स्नेहपान – आवडीप्रमाणे तेल – तूप खाण्यात ठेवावे. (पारंपारिक पद्धतीने बनविलेले साजूक तूप वजन, कोलेस्ट्रेरॉल वगैरे काहीही वाढवित नाही.)
  • ५) गर्भाशय शोधन – गर्भाशय पुन्हा मुळच्या स्थितीत येण्यासाठी तज्ञाच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
  • ६) कोष्ठशोधन – प्रसूतीनंतर तिस-या किंवा चौथ्या दिवशी पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावे.
  • ७) स्तन्योत्पत्ती – अंगावरचे दूध पुरेसे, सकस येण्यासाठी औषधोपचार घ्यावा.
  • ८) रक्षोघ्न चिकित्सा – योनीप्रदेशी औषधी धूपन घ्यावे. ही म्हणजे आयुर्वेदिक antiseptic treatment आहे.
  • ९) स्नान – चौथ्या दिवसापासून गरम पाण्याने स्नान करावे.
  • १०) आहार विहार – पथ्यकर आहार विहार व सात्विक आचरण ठेवावे.

या सगळ्या गोष्टी प्रसूतीनंतर कमीतकमी सव्वा महिना तरी पाळायला हव्यात.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.