ब-याच जणांना एखादा त्रास होत असतो किंवा एखादी विशिष्ठ सवय असते. ज्यावेळी त्यावर कोणाचाच इलाज चालत नाही तेव्हा ती त्याची प्रकृतीच आहे असे म्हणुन आपण ती गोष्ट सोडून देतो.

आयुर्वेदामध्ये या प्रकृतीलाच खूप महत्व आहे. आपल्याला शारिरीक किंवा मानसिक त्रास होऊ नये म्हणुन आणि काही त्रास होत असला तर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वतःची प्रकृती कोणती आहे ? हे माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीबरोबरच वैद्याला रुग्णाची प्रकृती कोणती आहे, हे समजणेसुद्धा तेव्हढेच आवश्यक आहे. कारण प्रकृतीनुसार एकाच रोगावरील वेगवेगळ्या व्यक्तीवरील उपचारांमध्ये फेरबदल करणे आवश्यक असते.

आपली प्रकृती म्हणजे आपल्या शरीराचा स्वभाव किंवा आपले शरीर जसे चलते ती पद्धत, जगातील प्रत्येक मनुष्य हा दुस-या व्यक्तीपेक्षा वेगळा आहे. दोन सख्ख्या जुळ्या भावांमध्येही काही ना काही फरक हा असतोच. त्यामुळे या जगात हजारो, लाखो प्रकारच्या प्रकृती आहेत. परंतु उपचार करतांना सोपे व्हावे म्हणुन काही गोष्टीतील साधर्म्य लक्षात घेऊन आयुर्वेदामध्ये सात प्रकारच्या प्रकृती वर्णन केलेल्या आहेत.

स्त्री बीज आणि पूरूष बीज यांचा संयोग होत असतांना ( गर्भधारणा होत असतांना ) वात, पित्त किंवा कफ यांपैकी जो / जे दोष उत्कट असतो तशी त्या गर्भाची प्रकृती बनते आणि संपूर्ण आयुष्यभर त्यात आपल्याला बदल करता येत नाहीत. गर्भिणी अवस्थेतील आईचा आहार – विहार, तिचे आचरण, गर्भाशयाची स्थिती आणि गर्भधारणेचा काळ यानुसार थोडेफार बदल होतात एव्हढेच.

थोडक्यात प्रकृती निर्माण होण्यात वात, पित्त आणि कफ या दोषांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळेच आयुर्वेदानुसार प्रकृतीचे सात प्रकार होतात. ते असे – वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, वातपित्त प्रकृती, वातकफ प्रकृती, पित्तकफ प्रकृती आणि समदोष प्रकृती.

व्यवहारात एकांतिक वात प्रकृती, पित्त प्रकृती किंवा कफ प्रकृतीची माणसे अगदीच क्वचित सापडतात. सर्वसाधारणपणे वातपित्त प्रकृती, पित्तकफ प्रकृती आणि वातकफ प्रकृतीचीच माणसे आढळतात. समदोष प्रकृतीची व्यक्ती ही स्वामी विवेकानंद, श्रीराम यांच्यासारखी विरळीच होय. दोन दोषांमुळे निर्मित प्रकृतीत त्या दोन दोषांची लक्षणे जास्त व तिस-या दोषाची लक्षणे थोडीशीच असे मिश्रण असते.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.