"आयुषो वेदः आयुर्वेदः !"
आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद...

"आयु वेदयति इति आयुर्वेदः ।"
आयुष्याचे ज्ञान करून देतो तो आयुर्वेद ...

"दोषधातुमलमुलं हि शरीरम् ।"
दोष, धातु, मल हे ज्याचे मूलभूत घटक आहेत ते शरीर...

शरीर हे आरोग्यपूर्ण असावे, निरोगी असावे यासाठी हजारो वर्षांपासून मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी खटपट करीत असतात, प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांमधुनच पाच हजार वर्षांचा इतिहास असणारा आयुर्वेद या मातीत रुजलेला आहे, फोफावलेला आहे.
आपण ज्या सृष्टीत राहतो त्या सृष्टीशी साम्य राखून आरोग्यप्राप्ती करणे सहज शक्य आहे, हा आयुर्वेदाच्या सिद्धांताचा गाभा आहे. त्यामुळे हजारो वर्षे होऊन गेली तरी आजही आयुर्वेद आपल्याला आरोग्य टिकविण्याची, स्वास्थ्य रक्षणाची ग्वाही देतो.
या हजारो वर्षांच्या काळात आयुर्वेदावर अनेकदा आक्षेप घेतले गेले, सवतीमत्सराचे प्रयोग केले गेले तरीही एक परीपूर्ण शास्त्र असल्याने आजही आयुर्वेदशास्त्र ठामपणे पाय रोवून उभे आहे.
केवळ कडू चूर्ण, काढे, आहारविहाराचे कडक पथ्यापथ्य म्हणजे आयुर्वेद नाही तर तेही एक शास्त्र आहे, त्यात काही सिद्धांत आहेत, घरगुती स्वरूपात घेण्याजोगे आयुर्वेद सोपे नाही, बाबा-बुवांकडून घेतलेली औषधे म्हणजे आयुर्वेद नाही. आयुर्वेदालाही एक शास्त्रीय बैठक आहे, हे जनसामान्यांना सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी केलेला प्रांजळ प्रयत्न म्हणजे हे संकेतस्थळ होय.
हा प्रयत्न कारणी लागावा हिच धन्वंतरीचरणी प्रार्थना.