सर्वसाधारणपणे आयुर्वेदिक डॉक्टर म्हटला कि तो आपल्याला भारंभार पथ्य सांगणार, आपल्या खाण्यावर कु-हाड आणणार अशी रुग्णाची भावना असते आणि ती भावना खूप चुकीची असते असेही नाही. पण पथ्य सांगण्यात आयुर्वेदिक डॉक्टरला खूप आनंद होत असतो असे मात्र नाही. ‘आधी हाताला चटके, मग मिळते भाकर’ ही म्हण येथे लागू पडते. औषधोपचार चालू असतांना थोडी पथ्ये पाळली तर नंतर आरोग्यरूपी भाकर जास्त चविष्ट लागते हे नक्की.

'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।' असा एक प्रसिद्ध श्लोक आहे. पुष्कळजण एक उपचार म्हणून हा श्लोक जेवाणापूर्वी नेमाने म्हणतात आणि जेवणात मात्र आडवा हात मारतात. हे चुकीचे आहे. नोकरीच्या ठिकाणी नेमून दिलेले काम केले नाही तर आपल्याला डच्चू मिळतो ना ? मग आपले शरीर चुकीचा आहार – विहार केला तर आरडाओरडा करणारच ना ? हा विचार आवश्यक आहे.

डॉक्टरने अपथ्य सांगितली कि रोग्याची पहिली प्रतिक्रिया असते कि ‘डॉक्टर, तुम्ही माझे सगळे आवडते पदार्थ बाद केले आहेत.’ पण याबाबतीत एक उदाहरण देता येईल कि जी व्यक्ती जास्त आवडते तीच व्यक्ती आपल्याला जास्त छळते, नाही का ? म्हणूनच भान ठेवून खाल्लेले अन्न कधीच त्रास देणार नाही. ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत् ।‘ हे इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

उपचार पद्धती कोणतीही असली तरी प्रत्येक डॉक्टरचे ध्येय हेच असते कि आपला रुग्ण बरा व्हावा, त्याच्या वेदना कमी व्हाव्यात आणि अशा वेळेला रुग्णानेही डॉक्टरच्या या प्रयत्नांना साथ देणे आवश्यकच आहे. म्हणूनच डॉक्टरने सांगितलेली पथ्ये, अपथ्ये प्रत्येक रोग्याने काटेकोरपणे पाळणे महत्वाचे आहे.

आता पथ्य म्हणजे नक्की काय हे आपण पाहिले पाहिजे. पथ्याची आयुर्वेदातील व्याख्या आहे ती अशी – “ पथ्यं पथोSनपेतं यत् ।“ म्हणजेच औषधी उपचारांच्या मार्गात अडथळा, अडचण आणत नाही ते पथ्य. थोडक्यात ज्या गोष्टी कराव्यात, जे पदार्थ खावेत ते “पथ्य” आणि ज्या गोष्टी टाळाव्यात, जे पदार्थ अजिबात खाऊ नयेत ते म्हणजे “अपथ्य”. थोडक्यात हितकर ते पथ्य आणि अहितकर ते अपथ्य.

वेगवेगळे रोग निर्माण होण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे वेगवेगळी असतात आणि त्यामुळेच त्यावरील औषधोपचारही वेगवेगळा असल्याने आपोआप पथय – अपथ्यसुद्धा वेगवेगळी असतात. तेलकट, तुपकट, तिखट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावीत अशा स्वरूपातील सवंग, वरकरणी पथ्यापथ्य आयुर्वेदिक डॉक्टर कधीच देत नाही. वात, पित्त, कफ या त्रिदोषांनुसार ज्या प्रकृती तयार होतात, त्याला अनुसरून आणि रोगाचा विचार करून पथ्यापथ्य ही ठरविली जातात. उदाहरणार्थ- तीन व्यक्तींनी एकाच वेळी , एकाच प्रमाणात दही खाल्ले तर तिघांनाही सर्दीच होईल असे नाही. त्या तिघांपैकी ज्याची कफ प्रकृती असेल त्याला सर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणुन त्याला दही हे अपथ्य झाले. थोडक्यात कोणताही पदार्थ हा चांगला – वाईट, पथ्याचा – अपथ्याचा असा नसतो, तर तो प्रत्येक व्यक्तीला प्रकृतीनुसार, होणा-या त्रासानुसार पथ्य कि अपथ्य, हितकर कि अहितकर हे ठरत असते. म्हणूनच आपल्या प्रकृतीनुसार आहार – विहार, पथ्यापथ्य ठेवले तर आपण आजारी पडणार नाही आणि आयुर्वेदाचे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण हे प्रयोजन यशस्वी होईल.

एकाचे पथ्य ते दुस-याचे अपथ्य असे होऊ शकते. कारण एखादा पदार्थ जसा एखादे चांगले काम करतो तेव्हाच तो दुसरीकडे वाईट कामही करतच असतो. म्हणुनच आपल्या शरीरात चांगले काम करणारे पदार्थ स्विकारणे आणि दुसरे पदार्थ दूर ठेवणे म्हणजे पथ्यापथ्य पाळणे. याचे उदाहरण असे देता येईल कि, ताप असतांना लंघन केले, उपवास केला तर ताप कमी व्हायला मदत होते पण धातूंची झीज होऊन झालेल्या संधीवाताच्या रोगामध्ये हेच लंघन त्याला त्रास वाढविणारे असते. त्यामुळे तापक-याला लंघन पथ्य तर संधीवाताने त्रस्त असणा-याला अपथ्य आहे. थोडक्यात पथ्य आणि अपथ्य हे प्रत्येक रोगात आणि प्रत्येक रोग्यात वेगवेगळे असते.

पथ्यापथ्याविषयी एक श्लोक आहे. त्याचा भावार्थ हाच आहे कि पथ्य पाळली तर औषधांची काय गरज ? आणि पथ्य नाही पाळली तर औषधांचा काय उपयोग ? म्हणजेच पथ्यापथ्य पाळणे ही आजार बरा करण्यातील आणि स्वास्थ्यरक्षणातील एक महत्वाची पायरी आहे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.