आजाराची लक्षणे जाणवू लागताच सुरूवातीला जोपर्यन्त आपण वैद्याकडे उपचारासाठी जाणार आहोत त्यादरम्यानचा जो काळ आहे त्याकाळात पथ्य पाळून आपला आजार वाढु नये व आजाराचे निश्चित कारण लक्षात यावे यासाठी येथे काही ठराविक आजारांतील पथ्य आणि अपथ्य वर्णन केलेले आहे. इतरत आजारांविषयीची माहिती लवकरच आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करणारच आहोत.

पथ्यापथ्य म्हणजे काय, त्याचे महत्व याविषयीची माहिती या संकेतस्थळावर इतरत्र दिलेलीच आहे. पथ्य म्हणजे चालणारे व अपथ्य म्हणजे न चालणारे, ज्याने आजार वाढु शकतो ते. आहार म्हणजे आपले खाणेपिणे आणि विहार म्हणजे आपले आचरण, आपले रूटीन. ज्या आजारातील पथ्यापथ्य आपल्याला वाचायचे आहे त्या आजाराच्या नावावर खाली क्लिक करा.

ज्वर / ताप

पथ्यकर आहार : ताप आला कि महत्वाचा आहार म्हणजे आहार न घेणे, लंघन करणे हा आहे. परंतु भुकेनुसार आपण उक्ळून गार केलेले पाणी, धणे – सुंठ- तुळशीची पाने टाकून उकळलेले पाणी, गायीचे दुध, ताजे ताक, कोकम सरबत, साळीच्या लाह्या घालून उकळलेले पाणी, जुने तांदूळ, मुगाचे कढण,राजगिरा, पडवळ, वांगी, कारल, तांदुळका, पालक, मुळ्याची कोवळी पाने इ. भाज्या, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे इ. फळे घेऊ शकतो. ताप जुना झाल्यावर तूप दिल्यास उत्तम मात्र नवीन तापात तूप टाळावे.

पथ्यकर विहार : पूर्ण विश्रांती घ्यावी. मोकळी हवा, पुरेसा प्रकाश असलेल्या खोलीत रहावे. अंगावर सुती कपडे घालावेत. पाण्याने अंग पूसावे.

अपथ्यकर आहार : चहा, कॉफी इ. गरम पेये, दही, कृत्रिम पेये (कोल्ड्रिंक्स), थंड पाणी, मद्य, मांसाहार, दुधापासून केलेले पदार्थ, मका, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, मटकी, वाल, तूर, मसूर, बटाटा, करडई, अंबाडी, मुळा, केळी, आंबा, पपई, लसूण, मिरची, लोणचे, फरसाण, आंबवलेले व बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न, अतिप्रमाणात पाणी पिणे ह्या गोष्टी टाळाव्यात.

अपथ्यकर विहार : राग येईल असे वागणे, दुःख वाढवेल अशा गोष्टी, व्यायाम, मैथुन, उन्हात बसणे, श्रम, रात्री जागरण, दिवसा झोप घेणे, भूक असतांना उपाशी राहणे, जेवणावर जेवण करणे, स्नान करणे, अभ्यंग करणे, स्वतःच केवळ तापा उतरविण्यासाठी परस्पर मेडिकल स्टोर्समधुन औषधे घेणे या गोष्टी तापात टाळायला हव्यात.

कृमीरोग / जंत

केवळ सहा महिन्यातून एकदा जंताची गोळी घेऊन जंतांचा त्रास बरा झालेला रुग्ण अजुन बघण्यात नाही. जंत हा प्रकार खूप चिवट आहे आणि त्यामुळे होणारे त्रास साध्या रोगापासून ते जटील रोगापर्यन्त असू शकतात. त्यामुळे जास्त काळ उपचार घेऊन जंत बाहेर काढणे आणि पून्हा होऊ नयेत म्हणून उपचार घेणे या दोन्ही गोष्टी कृमीरोगात आवश्यक ठरतात.

पथ्यकर आहार : पडवळ, शेवगा, चुक्याचा रस, कारले, तूर, कुळीथ, ताक , ताजे लोणी, वावडिंग टाकून उकळलेले पाणी, ओव्याचे पाणी, गरम पाणी, नारळ पाणी. लसूण, गोमूत्र, नागवेलीच्या पानांचा विडा, कात, कवठ, कच्चे केळ, गोड पदार्थ न घालता शिजविलेले अन्न.

पथ्यकर विहार :सकाळी व सायंकाळी लवकर जेवून त्यानंतर पायी फिरणे जेणेकरून पचनसंस्था, जिथे जंतांचे वास्तव्य असते ती व्यवस्थित काम करीत राहील.

अपथ्यकर आहार : अतिशय थंड पाणी, शिळे पाणी, दुर्गंधित पाणी, दूध, दही, पचण्यास जड पदार्थ – उदा. गहू, गुळ, जोंधळा तसेच पालेभाज्यांचे सर्व प्रकार, तोंडली, तांबडा भोपळा, उडीद, चवळी, वाटाणा, वाल, पिकलेली केळी, अननस, सीताफळ, कलिंगड, रताळी, नवलकोल, बटाटा. जास्त पाणी पिणे हे सर्व टाळावे.

अपथ्यकर विहार : भूक नसतांना जेवण करणे, वरचेवर सतत खात रहाणे, उलटी होत असतांना थांबविणे ( अँन्टासिड घेऊन जळजळ आणि मळमळ थांबविणा-यांनो…सावधान) दिवसा झोप घेणे, शरीर – नखं अस्वच्छ असणे, अन्नपदार्थ अस्वच्छ असणे

अम्लपित्त

ज्यांना अम्लपित्ताचा त्रास होतो, अँसिडिटीचा त्रास होतो त्यांनी आधी आपल्याला खरोखर अम्लपित्त आहे कि अजीर्ण (विदग्धाजीर्ण) हे निदान करून घेणे आवश्यक आहे. तेही एखाद्या चांगल्या वैद्याकडून ( डॉक्टर…नाही) करून घेणे महत्वाचे आहे. आणि जर अम्लपित्त असेल तर खालची पथ्यापथ्य पाळावीत.

पथ्यकर आहार : उकळलेले पाणी, दूध, तूप, लोणी, लिंबू, आवळा, डाळिंब, कवठ, नारळ, अंजीर, काळ्या मनुका, दुधी, भेंडी, पडवळ, कोबी, काकडी, दोडके, मूग, गहू, जव, बाजरी, जुने तांदूळ, नाचणी, हळद, सुंठ बडिशेप, धणे, जिरे, कोथिंबीर, वेलची व योग्य प्रमाणात जायफळ व दालचिनी ह्या गोष्टी चालतील.

पथ्यकर विहार :मन / चित्त प्रसन्न राहील असे वातावरण तयार करावे, विश्रांती घ्यावी ( म्हणजे नसती उठाठेव न करता आवश्यक तेव्हढेच काम करावे), जेवण वेळच्यावेळी आणि भूक असेल त्यानुसार घ्यावे. रात्री लवकर झोपावे.

अपथ्यकर आहार :थंड पाणी, बर्फ, अतिशय गरम पाणी, ताक, दही, कच्चा लसूण, कांदा, साबूदाणा, चिंच, टोमँटो, संत्री, अननस, लिंबू, मांसाहार, कुळीथ (हुलगे), नवीन धान्य, सुक्या उसळी, पोहे, मेथी, शेवगा, अतिप्रमाणात कारले, फ्लॉवर, चमचमीत पदार्थ, वडे-भजी असे पदार्थ, मिसळ, अतिप्रमाणात मीठ, शिळे पदार्थ, चहा, कॉफी, मद्य, विरुद्ध आहार ( विरुद्ध आहाराविषयी अधिक माहिती याच संकेतस्थळावर इतरत्र आहे)

अपथ्यकर विहार :रात्री उशिरा जेवणे, अतिमैथुन, जास्त चिंता करणे, जास्त व्यायाम, पान-तंबाखु, सिगारेट-बिडी, वारंवार रागावणे, भरपेट जेवून लगेच झोपणे, उष्णतेच्या संपर्कात सतत काम करणे, नेहेमी बसून राहणे.

कावीळ

कावीळ हा तसा जास्त त्रासदायक प्रकार आहे. त्यामुळे त्याच्यावर बाबाबुवांकडून उपचार करण्यात वेळ आणि स्वास्थ्य घालवू नये. तज्ञाकडूनच औषद्गोपचार घ्यावा. आयुर्वेद कावीळीवर उत्तम कार्य करतो.

पथ्यकर आहार : उकळलेले पाणी, तूप, दह्याचे वरचे पाणी (दही नव्हे), काळ्या मनुकांचे पाणी, मोसंबी, तज्ञाच्या सल्ल्याने ऊस / ऊसाचा रस पिणे, डाळिंब, जुने तांदूळ गहू (फुलके), दुधी, पडवळ, पुनर्नवा, मूग, मसूर, आले, ओली हळद.

पथ्यकर विहार :संपूर्ण विश्रांती हे महत्वाचे पथ्य आहे. अन्य चालणा-या गोष्टीत आहाराचे सामान्य पथ्य पाळणे व भूकेनुसार खाणे महत्वाचे आहे.

अपथ्यकर आहार :अतिथंड पाणी, म्हशीचे दूध, दही ताक, मध, कलिंगड, सीताफळ, जांभूळ, संत्री, पेरू, केळी, बटाटा, रताळी, साबुदाणा, नवलकोल, ज्वारी, बाजरी, मका, वरई, उडीद, कुळीथ, वाल, वाटाणा, पालेभाज्या, चिंच, टोमँटो, तांबडा होपळा, मांसाहार हे टाळावे.

अपथ्यकर विहार :व्यायाम, श्रम, मैथुन, दिवसा झोपणे याने आजार वाढतो आणि जास्त दिवस कावीळ राहिली तर गंभीर होऊन जीवावर बेतू शकते.

दमा

दमा या आजारात श्वास, जो जगण्यासाठी आवश्यक आहे, तोच शरीराला कमी पडत असतो. त्यामुळे दम्याचा त्रास होत असेल तर हयगय अजिबात करू नये. लवकरात लवकर औषधोपचार घ्यावा.

पथ्यकर आहार : उकळलेले पाणी, सुंठ घालून उकळलेले पाणी, दूध, तूप, लोणी ( हे सर्व बकरीचे ,असेल तर उत्तम), द्राक्ष, महाळूंग, डाळिंब, वेलची, केशर, लवंग, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, गहू, सातू, जुने तांदूळ, तांबडी साळ, भेंडी, तोंडली, पडवळ, लसूण, आले, ओली हळद.

पथ्यकर विहार :विश्रांती घ्यावी. छातीस व सर्व अंगास तीळ तेलात सैंधव मीठ घालून मालीश करावी व नंतर साध्या पाण्याची वाफ घ्यावी. औषधी द्रव्यांचे धूर घ्यावेत.

अपथ्यकर आहार :थंड पाणी, शिळे पाणी, दही, ताक, वाल, मटकी, वाटाणे, शेवगा, तांबडा भोपळा, शेवग्याची शेंग, मेथी, अर्धवट पिकलेली केळी, जांभूळ, फणस, ताडगोळे, मका, तळलेले पदार्थ, पापड, लोणची, चिंच, मुरमुरे (चुरमुरे), कंदभाज्या.

अपथ्यकर विहार :वश्रम पडतील असे काम जसे व्यायाम, मैथुन, उन्हात फिरणे टाळावे. वारा, धूर, धूळ यांच्या संपर्कात येणे टाळावे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.