सर्वसाधारणपणे आयुर्वेदिक औषधे म्हणजे कडू काढे किंवा चूर्णे असा समज आहे. परंतू आयुर्वेदात औषधांची वेगवेगळी स्वरूपे वापरली जातात. खाली दिलेली आयुर्वेदिक औषधांची स्वरूपे बघितली की नक्कीच थक्क व्यायला होते की किती वेगवेगळ्या स्वरूपात आयुर्वेदिक औषधे असतात.

 • १) स्वरस : ताजी औषधी वनस्पती पाट्यावर वाटून काढलेला रस म्हणजे स्वरस. उदा. आल्याचा रस, तुळशीचा रस.
 • २) कल्क : पाट्यावर वाटून केलेली औषधीची चटणी म्हणजे कल्क. उदा. लसूण कल्क.
 • ३) क्वाथ / कषाय : औषधे पाण्यात टाकून उकळवून केलेला काढा म्हणजे क्वाथ / कषाय. उदा. पथ्यादी काढा, महामंजिष्ठादी क्वाथ, कोकिलाक्ष कषाय इ.
 • ४) हिम : पाण्यात औषध भिजवून काही काळ ठेवून गाळून घेणे म्हणजे हिम. उदा. धण्याचे पाणी.
 • ५) फांट : गरम पाण्यात औषध भिजत टाकून गार झाले कि गाळून घेणे म्हणजे फांट. उदा. आरग्वधादी फांट.
 • ६) अर्क : औषधी उकळवून काढलेला अर्क. उदा. ओवा अर्क, बडीशेप अर्क.
 • ७) अवलेह : चाटून खाण्याजोगा साखरेच्या पाकातील औषधीचा प्रकार. उदा. च्यवनप्राश अवलेह.
 • ८) चूर्ण : वाळलेल्या औषधींची भुकटी म्हणजे चुर्ण. उदा, सुंठ चूर्ण, आवळा चूर्ण, सितोपलादि चूर्ण इ.
 • ९) गुटी, वटी : स्वरसात / काढ्यात / पाण्यात औषधी कालवून त्याचा गोळा बनवून लहान लहान वळलेल्या गोळ्या म्हणजे गुटी, वटी. उदा. चंद्रप्रभा वटी, लवंगादी वटी इ.
 • १०) गुग्गुळ कल्प : विविध औषधे व शुद्ध गुग्गुळ एकत्र कुटून तयार केलेले औषध म्हणजे गुग्गुळ कल्प. उदा. मेदोहर गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ इ.
 • ११) लवण कल्प : विविध लवणे वापरून विशिष्ठ पद्धतीने बनविलेली औषधे. उदा. नारिकेल लवण, अर्क लवण इ.
 • १२) मषी कल्प : औषधी जाळून त्याची केलेली काळी राख. उदा. मयुरपिच्छा मषी, त्रिफळा मषी.
 • १३) क्षार : औषधी जाळून त्याची पांधरी राख करून त्यापासून वेगळे मिळविलेले औषध. उदा. अपामार्ग क्षार, तिलक्षार इ.
 • १४) सत्व : औषधी पाण्यात भिजत ठेवून नंतर गाळून त्या पाण्यातून तयार केलेले औषध. उदा. गुळवेल सत्व.
 • १५) स्नेहपाक : तेल / तूप व वेगवेगळे काढे, स्वरस एकत्र उकळवून तयार केलेले औषध. उदा. त्रिफळा घृत, महातिक्त घृत, महानारायण तेल, शतावरी तेल इ.
 • १६) संधान कल्पना : विविध औषधे एकत्र करून धान्याच्या राशीत काही दिवस पूरून ठेवून नंतर गाळून तयार केलेले औषध. उदा. दशमूलारिष्ट, कुमारी आसव, द्राक्षासव इ.
 • १७) लेप, मलम : घोटून बाहेरून लावण्यासाठी तयार केलेली औषधे. उदा. पाददारी मलम, निंबादी मलम दशांग लेप, शोथहर लेप इ.

या व्यतिरिक्त पारा आणि इतर खनिज पदार्थ आणि प्राणिज पदार्थांपासूनही तयार केली औषधे आयुर्वेदात वापरली जातात. विशेष म्हणजे यापासून काहीही अपाय होत नाही. (अधिक माहिती वाचा…)

 • १) भस्म : उदा. लोह भस्म, अभ्रक भस्म, सुवर्ण भस्म इ.
 • २) कुपीपक्व रसायन : उदा. मकरध्वज, समीर पन्नग इ.
 • ३) खल्वी रसायन : खलून तयार केलेली सूतशेखर, आरोग्यवर्धिनी इ. औषधे.
 • ४) पर्पटी कल्प : विशेष पद्धतीने कढईत पातळ करून तयार केलेले औषध. उदा. रस पर्पटी, पंचामृत पर्पटी.
 • ५) लोह कल्प : लोह / मण्डूर भस्म युक्त औषधे. उदा. ताप्यादी लोह, पुनर्नवा मण्डूर, नवायस लोह इ.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.