कोणत्याही उपचार पद्धतीत उपचार करण्यापूर्वी ते उपचार ज्या शरीरावर केले जाणार आहेत, त्या शरीराचा आधी विचार केला जातो. आयुर्वेदाने शरीर या शब्दाचीदेखील व्याख्या दिलेली आहे.

"शीर्यते तत् शरीरम् ।" : जे सतत झिजते ते शरीर होय.

"आत्मनो भोगातनं शरीरम् ।" : आत्म्याचे भोगाचे स्थान, घर म्हणजे शरीर.

"दोषधातुमलमुलं हि शरीरम् ।" : दोष, धातु, मल हे ज्याचे मूलभूत घटक आहेत ते शरीर.

या जगात निरनिराळ्या वनस्पती वाढतांना बघितले कि लक्षात येईल कि या वनस्पती माती आणि पाण्यातून आपले पोषक अंश शोषून घेतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीने नंतर या अंशांचे रूपांतर करून स्वतःचे पोषण करून घेतात. ही प्रक्रिया अखंड सुरू असते. यात पुष्टी / वाढ, रूपांतर किंवा पचन आणि वहन या क्रिया प्रामुख्याने दिसतात. या जगात या क्रिया चंद्र, सूर्य आणि वारा या तिघांच्या अधीन आहेत. थंड गुणाने , सौम्य गुणाने चंद्र सृष्टीला बल देतो, रूपांतर – पचनाची क्रिया सूर्याच्या उष्ण गुणाने होते तर चलनवलन, हालचाल ही वारा घडवून आणतो. आपल्या शरीरातही हीच प्रक्रिया कफ, पित्त आणि वात या तीन दोषांकडून घडत असते. चंद्र हा शीतल, सौम्य, बल देणारा आहे त्याप्रमाणे कफ दोष शरीराची पुष्टी करणारा, वाढ करणारा आहे. सूर्यामुळे रुपांतर, पचन (पिकणे) होते त्याप्रमाणे शरीरात पित्त दोष अन्नग्रहण, अन्नपचन आदी क्रिया करतो. ज्याप्रमाणे वारा ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतो त्याप्रमाणे शरीरात वात दोष अन्न, रसरक्त आदींचे वहन करतो. याप्रमाणे या त्रिदोष सिद्धांतावर आयुर्वेद खंबीरपणे उभा आहे.

हे त्रिदोष जेव्हा योग्य प्रमाणात असतात तेव्हा जीवन व्यवस्थित सुरू असते. परंतु त्यांच्यात जेव्हा असमतोल होतो तेव्हा रोगाची निर्मिती होते. थोडक्यात दोषांमध्ये रोगनिर्मिती करण्याची शक्ती आहे म्हणुन त्यांना दोष असे म्हणतात. एकमेकांशी विशेष न पटणारे तीन भाऊ जसे एकाच घरात व्यवस्थित राहत असतात त्याप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म असणारे तीन दोष एकाच शरीरात राहत असतात. पण कारण घडलं कि तिघांमध्ये असमतोल होऊ शकतो हेही तितकेच खरे.

या तीन दोषांचे शरीरातील कार्य पुढीलप्रमाणे आहे.

कफ दोष : शरीराला बल देणे, शरीराची दृढता, पुष्टी, उत्साह, वृषता ( शुक्राचे बल, उपभोग घेण्याची उत्तम शक्ती), शरीरातील स्निग्धता, निरनिराळे सांधे एकत्र जोडून ठेवणे, सांध्यांची हालचाल सुकर करणे, क्षमाशिलता, धैर्य, अलोभत्व हे शारीर व मानस गुण कफ दोषाचे आहेत.

क्लेदक, अवलंबक, बोधक, श्लेषक आणि तर्पक हे कफाचे पाच प्रकार शरीरातील विविध ठिकाणी आपले कार्य करीत असतात.

सर्व शरीरात प्राकृत कफ असला तरी छाती, घसा, डोके, टाळू, बोटांची पेरे, आमाशय, रस आणि मेद धातू, नाक, जीभ ही कफाची विशेष स्थाने आहेत. आणि त्यातही छाती हे अजुनच विशेष स्थान आहे.

पित्त दोष : डोळ्यांनी बघणे, पचन करणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, शरीराचा स्वाभाविक रंग ( काळा, सावळा, गोरा इ.) व्यवस्थित नियंत्रित ठेवणे, शरीराची कोमलता टिकविणे, भूक – तहान यावर नियंत्रण, मेधा – बुद्धी, शौर्य, क्रोध, आनंद, प्रसन्नता हे शारीर मानस भाव पित्ताचे आहेत.

साधक, आलोचक, पाचक, रंजक आणि भ्राजक हे पिताचे पाच प्रकार आहेत जे शरीरात विविध ठिकाणी आपले कर्य करीत असतात.

सर्व शरीरात प्राकृत पित्त असले तरी नाभी (बेंबीचा भाग), आमाशय, घाम, लसिका, रसधातू, नेत्र (दृष्टी), त्वचा ही पित्ताची मुख्य स्थाने आहेत. त्यातही नाभी हे विशेष स्थान आहे.

वात दोष : शरीरातील सर्व हालचाली, हॄदयाचे आकुंचन – प्रसरण, डोळ्यांच्या हालचाली यापासून चालणे, पळणे इ. सर्व क्रियांसाठी वात दोष आवश्यक आहे. कफ आणि पित्त दोषांचे वहनही वात दोषच करतो. मनावर नियंत्रण, पचनशक्ती वाढविणारा, गर्भाची आकृती तयार करणारा वात दोषच आहे. शरीराला त्रासदायक मळ बाहेर टाकणाराही वात दोषच आहे.

प्राण , उदान, समान, व्यान आणि अपान हे वात दोषाचे पाच प्रकार शरीरात निरनिराळ्या ठिकाणी आपले कार्य करीत असतात.

सर्व शरीरात वात कार्य करीत असला तरी पक्वाशय (मोठे आतडे), कंबर, मांड्या, कान, हाडे आणि त्वचा ही वाताची मुख्य स्थाने असून पक्वाशय विशेष स्थान आहे.

धातू

वात, पित्त आणि कफ दोष शरीरात दोष निर्माण करू शकतात म्हणुन त्यांना दोष म्हणतात. पण हे दोष कशात निर्माण करतात ? तर ते निर्माण होतात धातू आणि मळात. लोखंड, तांबे वैगरे धातू आणि आयुर्वेदाने शरीरातील धातू यांचा सुतराम संबंध नाही.

"धारणात् धातवः ।" म्हणजे जे घटक शरीराचे धारण करतात, शरीर धरून ठेवतात ते म्हणजे धातू.

खरं तर दोष – धातू – मल हे सगळेच घटक प्राकृत असतांना शरीराचे धारण करत असतात. पण ज्या घटकांवर प्रामुख्याने शरीरधारण अवलंबून असते त्यांना धातू असे म्हटले जाते. शरीरात एकुण सात धातू आहेत. ते म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र धातू.

या सात धातूंची शरीरातील कार्ये पुढीलप्रमाणे –

  • रस धातू : आहार पचल्यावर तयार होणारा घटक म्हणजे रस धतू. प्रीणन करणे, आल्हादन करणे, शरीराला टवटवी आणणे हे याचे काम.
  • रक्त धातू : रक्त न जाणणारा विरळाच. याचे काम म्हणजे जीवन. सर्व शरीर घटकांचे जीवन.
  • मांस धातू : मांस नसेल तर शरीर म्हणजे नुसता हाडांचा सापळा वाटेल. म्हणुन शरीर घटकांवर लेपन करणे, आच्छादन करणे हे याचे कार्य.
  • मेद धातू : फाजिल विकृत मेद वाईट असला तरी शरीरातील स्निग्धता, तुकतुकी, स्नेह टिकुन राहण्यासाठी योग्य , प्राकृत मेद धातू आवश्यकच आहे.
  • अस्थि धातू : या हाडांमुळेच शरीराला एक छान आकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे धारण हे याचे कार्य..
  • मज्जा धातू : हाडांच्या पोकळ्यांचे पूरण करणे, पोकळ्या भरून काढणे हे याचे कार्य.
  • शुक्र धातू : स्वतःसह इतर घटक पदार्थांनी, दोषधातूमलांनीयुक्त नविन सजीवाची निर्मिती करणे, गर्भ उत्पत्ती करणे हे या शुक्र धातूचे कार्य.

हे सातही धातू योग्य प्रमाणात, योग्य प्रतीचे असतील तरच शरीराचे धारण होते आणि या धारणासाठी आवश्यक असणा-या धातूंना बिघडविण्याचे काम करतात विकृत, बिघडलेले दोष.

मल

अन्न, पाणी यांचे सेवन केल्यावर शरीराचे पोषण ओण्यासाठी अन्न, पाण्यावर पचनक्रिया होते. या क्रियेदर्म्यान मल तयार होतात. आयुर्वेदानुसार तीन मुख्य मळ आहेत. ते म्हणजे पुरीष ( शौचाचा मळ ), मुत्र ( लघवी ) आणि स्वेद ( घाम )

कोणत्याही गोष्टींचे ज्ञान व्हावे यासाठी ज्ञानेंद्रिये, कर्मेन्द्रिये आणि मन या गोष्टी आपल्या शरीरात असतात. असे हे अनेक घटकांचे माहेरघर असणारे आपले शरीर खरोखर आरोग्यपूर्ण, स्वस्थ, निरोगी आहे हे कसे ठरवावे ? तर आयुर्वेदाने स्वस्थाची व्याख्या पुढीलप्रमाणे दिलेली आहे

"समदोषः समाग्निश्च समधातूमलक्रिया । प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधियते ॥"

ज्याचे दोष सम आहेत, अग्नि योग्य आहे, धातू – मल – क्रिया सम, योग्य आहेत आणि आत्मा – इंद्रिये आणि मन प्रसन्न आहे ती व्यक्ती स्वस्थ होय.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.