पंचकर्म :

शोधन आणि शमन चिकित्सा हे चिकित्सेचे दोन प्रकार आहेत. यापैकी “शोधन चिकित्सा” म्हणजेच पंचकर्म चिकित्सा होय. पंचकर्म या शब्दात पंच आणि कर्म हे दोन शब्द आहेत. पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे क्रिया किंवा उपक्रम होय.. हे पाच उपक्रम म्हणजे १) वमन २) विरेचन ३) बस्ती ४) नस्य ५) रक्तमोक्षण.

कोणतेही पंचकर्म करावयाचे असले तरी त्यापूर्वी दोन उपक्रम अवश्य करावे लागतात. ते म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. यांनाच “पूर्वकर्म” असेही म्हटले जाते.

स्नेहन : या उपक्रमात रोग्याला त्याला जो आजार आहे त्यानुसार योग्य ते औषधी तूप, तेल पिण्यासाठी तसेच संपूर्ण अंगाला लावण्यासाठी दिले जाते. ज्याप्रमाणे गंजलेला स्क्रू तेल सोडले कि सहज सुटा होतो, त्याप्रमाणे या तेल – तूपामुळे शरीरातील धातूंना चिकटलेले विकृत दोष सुटे होतात, मोकळे होतात, शरीर अवयवांना मृदुता येते.

स्वेदन : स्वेदन याचा अर्थ घाम आणणे, steam bath. संपूर्ण अंगाला स्नेहन केल्यानंतर स्वेदन केले जाते. वाफेद्वारे, गरम वस्तुंद्वारे रोग्याला घाम आणला जातो. जे दोष स्नेहनामुळे सुटे, मोकळे झालेले असतात ते स्वेदनामुळे पातळ होऊन कोष्ठाकडे, अन्नमार्गाकडे प्रवृत्त होतात.

अशाप्रकारे स्नेहन, स्वेदनामुळे सुटे होऊन कोष्ठात आलेले दोष मुखावाटे ( वमनाद्वारे) किंवा गुदमार्गाने ( विरेचन / बस्तीद्वारे) बाहेर काढुन टाकणे सोपे जाते.

मुख्यत्वे पंचकर्मांपूर्वी करावयाचे पूर्वकर्म म्हणून स्नेहन, स्वेदन केले जात असले तरी पुष्कळवेळी मुख्य चिकित्सा म्हणूनही केवल स्नेहन, स्वेदन यांचा वापर केला जातो.

ज्यांना स्वेदन करावयाचे आहे, ज्यांना वमन-विरेचन आदि शोधन उपचार करावयाचे आहेत, रुक्ष (कोरडे) शरीर असलेले, वातरोगांनी त्रासलेले (संधीवात वगैरे), नेहेमी जास्त व्यायाम करणारे, अति मद्यपान करणारे, अधिक प्रमाणात मैथुन करणारे, नेहेमी चिंता करणारे, युद्ध आदी कर्मे करणारे, अतिवृद्ध व्यक्ती, स्त्रिया, कृश शरीर असणारे यांना स्नेहन उपयुक्त आहे. मग ते पोटात स्नेह (तेल – तूप) देऊन असो किंवा बाहेरून मालीश या स्वरूपात असो. रुग्णानुसार तज्ञ वैद्य तेल वापरायचे कि तूप, तेल कोणते वापरायचे, तूप कोणते वापरायचे हे ठरवतो.

वमन विरेचन आदि शोधन उपचारांचे पूर्वकर्म म्हणून जसे स्वेदन केल जाते, त्याप्रमाणे काही रुग्णांमध्ये ते आजारावरील चिकित्सा म्हणूनही केले जाते. सर्दी, खोकला, उचकी, दमा, कानदुखी, मानदुखी, डोकेदुखी, आवाज बसणे, वेगवेगळे वातरोग, पक्षाघात, पोटात वायु धरणे, पाठ-कंबर-पोट-पाय-गुडघे-मांड्या यातील वेदना, सायटिका, अंगदुखी, कंपवात, एखादा अवयव जखडणे, मूतखडा, मूळव्याध, भगंदर, गाठी यात स्वेदन उपयुक्त आहे.

स्नेहन आणि स्वेदन केल्यानंतर मुख्य पंचकर्मांपैकी रुग्णासाठी जे योग्य असेल ते कर्म केले जाते.

वमन : वमन म्हणजे औषधींच्या सहाय्याने रोग्याला उलटी करावयास लावणे. मुख्यत्वे हा शरीरातील विकृत कफदोष बाहेर काढण्यासाठीचा उपक्रम आहे.

तीन, पाच किंवा सात दिवस स्नेहन स्वेदन केल्यानंतर कफ वाढविणा-या पदार्थांनी ( उदा. दही, उडीद, वडे इ.) आमाशयातील कफ चाळवून सकाळी हा उपक्रम केला जातो. यात रोग्याला औषधांचा काढा ऊसाचा रस वगैरे पदार्थ आकंठ पिण्यास देऊन नंतर वामक औषधांचे चाटण दिले जाते. त्यामुळे उलटी होऊन काढा, ऊसाचा रस इ. प्यायलेले पदार्थ व विकृत कफ दोष उलटीद्वारे बाहेर काढले जातात.

आजार कोणता आहे हे ठरवून त्यानुसार वमन केव्हाही देता येते. परंतु स्वस्थ व्यक्तींनी स्वास्थ्य टिकविण्यासाठी म्हणून वसंत ॠतूत ( साधारण मार्च – एप्रिलचा काळ) वासंतिक वमन विधीवत करून घेणे जास्त श्रेयस्कर आहे.

नवीन ताप, जुलाब, अधोग रक्तपित्त (मूत्र-शौच याद्वारे रक्तस्त्राव होणे), त्वचारोग, प्रमेह, गाठी, हत्तीपाय रोग, उन्माद, खोकला, दमा, मळमळ, स्तन्याचे दोष, कफाचे आजार, गलगंड, मूळव्याध, अरुचि (तोंडाला चव नसणे), पचन बिघडणे, सूज, वारंवार तोंड येणे, अपस्मार (फिट येणे), स्थूलपणा, हॄदयरोग यात वमन उपयुक्त ठरते. या रोगांच्या यादीवरून सहज लक्षात येईल कि वमनाचे कार्य हे फक्त आमाशयापूरता मर्यादीत नसून सर्व शरीरात उत्पन्न होणा-या रोगातही ते उपयुक्त आहे.

विरेचन : विरेचन म्हणजे औषधांच्या सहाय्याने जुलाब देणे. मुख्यत्वे विकृत पित्त दोष बाहेर काढण्यासाठी हे उपयुक्त आहे. तीन, पाच किंवा सात दिवस स्नेहन – स्वेदन केल्यानंतर विरेचनाचे औषध दिले जाते. आदल्या दिवशीचे रात्रीचे भ्जन पूर्ण पचल्यानंतर सकाळी सुमारे दहा वाजेच्या आसपास विरेचन (जुलाब) करणारे औशःअध दिले जाते. दिवसभर रोग्याला शांत पडून राहण्यास सांगितले जाते व जेव्हा जुलाबाचा वेग येईल तेव्हा शौचाला जाण्यास सांगितले जाते.

वमनाप्रमाणे रोग्याच्या व रोगाच्या अवस्थेनुसार विरेचन केव्हाही देता येते. परंतू स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्य रक्षणासाठी शरद ॠतूत (ऑक्टोबर हीटचा काळ) विरेचन दिले जाते.

ताप, त्वचारोग, प्रमेह, उर्ध्वग रक्तपित्त (तोंड, नाक, कान यातुन रक्तस्त्राव होणे), भगंदर, मूळव्याध, प्लीहा रोग (पांथरी), वायुगोळा, गलगंड, मूत्राच्या तक्रारी, जंत, पांडूरोग, डोकेदुखी, डोळ्यांची आग, तोंडाची आग, हॄदयरोग, त्वचेवरील निळसर डाग, डोळ्यातून पाणी येणे, कावीळ, दमा, खोकला, उन्माद, अपस्मार (फिट येणे), वातरक्त (गाऊट), योनीदोष, शुक्रदोष, जलोदर, उलटी, सूज, मळमळ, गरविष, नाक-गुद-कान-लिंगाची आग होणे, पोटात वायु धरणे यावर विरेचन हे कर्म उपयुक्त ठरते.

वमनाप्रमाणे विरेचनदेखील केवळ पोट साफ करणे एवढे मर्यादीत कार्य न करता सर्व शरीरातील रोगांवर उपयुक्त ठरते हे वरील रोगांच्या यादीवरून सहज लक्षात येते.

बस्ती : गुदद्वारावाटे औषधी काढा किंवा तेल, तूप घालून दोष बाहेर काढणे म्हणजे बस्ती होय. बस्ती हा उपक्रम मुख्यत्वे वात दोषावर कार्य करणारा आहे.

स्नेहन (अंगाला बाहेरून तेल लावून) करून स्वेदन दिल्यानंतर बस्तीद्व्वरे औषध गुदद्वारातून आत सारले जाते. बस्ती ही एक परिभाषा आहे. पूर्वीच्या काळी प्राण्याचा बस्ती (मूत्राशय) व्यवस्थित रापवून त्यात औषधी भरून व त्याला तोंडाला नळी जोडून रोग्याच्या गुदद्वारातून औषधी दिली जात असे. बस्तीच्या सहाआने दिली जाते म्हणोन त्याला बस्ती हे नाव पडले. सध्याच्या काळात यासाठी एनिमा पॉट, प्लास्टिक सिरिंजेस, रबरी कँथेटर आदींचा वापर केला जातो.

जेव्हा औषधी काढा बस्तीद्वारे दिला जातो तेव्हा त्याला निरुह बस्ती म्हणतात आणि जेव्हा औषधी तेल गुदद्वारातून बस्तीद्वारे आत सारले जाते तेव्हा त्याला अनुवासन बस्ती असे म्हटले जाते.

वर्षभरात केव्हाही रोग्याच्या आणि रोगाच्या अवस्थेनुसार बस्ती देता येतो. परंतू स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्य रक्षणासाठी वर्षा ॠतूत (पावसाळ्यात) बस्तीचा कोर्स घेणे उपयुक्त आहे.

सर्वांग रोग एकांग रोग, प्लीहा रोग, वायुगोळा (गुल्म रोग), पोटद्खी, हॄदयरोग, जंत, पोटात वायु धरणे, भगंदर, ताप, डोके-कान-हॄदय-पाठ-कंबरदुखी, कंबर जखडणे, कंपवात, अंगाचा जडपणा, स्त्रीयांतील मासिक पाळीच्या तक्रारी, हाडातील वेदना, सांध्यांचे आजार, फिशर, सर्व वातविकार, मूतखडा, वातरक्त (गाऊट रोग), मूळव्याध, स्तन्याचे विकार, लघवीचे आजार, त्वचारोग, वंध्यत्व यात बस्ती उपयुक्त आहे.

सात, पंधरा किंवा तीस बस्तींहा एक कोर्स अशा पद्धतीने बस्ती चिकित्सा केली जाते.

नस्य : नस्य म्हणजे नाकातून औषध टाकून दोष बाहेर काढणे. नाकात औषध टाकले जाते म्हणून याला नस्य म्हणतात (नासिकाभ्यां औषधम् औषधसिद्धो वा स्नेहो दीयत ।)

नस्यासाठी तेल, तूप, दुध, गोमूत्र, औषधांचा काढा, चूर्ण, औषधांचा धूर यांचा वापर केला जातो.

कपाळ आणि नाकाच्या भागात तेलाने मसाज करून वाफ दिली जाते / शेक दिला जातो. त्यानंतर मान किंचित मागे करून औषध योग्य मात्रेत नाकात सोडले जाते.

डोकेदुखी, डोके जड होणे, डोळ्यांचे विकार, गलगंड, कुष्ठ , त्वचाविकार, अपस्मार, सर्दी, कानाता आवाज येणे, बहिरेपणा, अर्धशिशी, नाकाचे रोग, वास न येणे, नाकाचे हाड वाढणे, डोके दुखणे, मानदुखी (स्पॉन्डिलोसिस), दातांचे रोग, केस गळणे, केस पांढरे होणे, आवाज बसणे, झोपेतून लवकर जाग न येणे यासारख्या आजारांवर नस्य उपयुक्त आहे. थोडक्यात मानेच्या वरच्या भागात होणा-या आजारात नस्य उपयुक्त आहे.

रक्तमोक्षण : शरीरातून रक्त काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय. रक्त हा शरीरातील खूपच महत्वाचा धतू आहे. जीवन हे त्याचे कार्य आहे. परंतू जेव्हा रक्त बिघडते, त्यावेळेस वेगवेगळे रोग निर्माण होतात. म्हणून अशा रोगांमध्ये दोषांनी बिघडविलेले रक्त शरीराबाहेर काढले जाते. त्यासाठी जळवा (Leech) लावणे, तुंबडी लावणे किंवा शिरेतून सुईच्या सहाय्याने रक्त काढणे या क्रियांचा अवलंब केला जातो.

शरीरातील रक्त धातू आणि पित्त दोष यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे आणि शरद ॠतूत (ऑक्टोबर हीटचा काळ) पित्त प्रकुपित झालेले असते. म्हणूनच रक्तमोक्षणही याच काळात केलेल उपयुक्त ठरते. परंतू विविध रोगात अवस्थेनुसार वर्षभरात केव्हाही रक्तमोक्षण करता येते. फक्त रक्तमोक्षणाच्या वेळी खूप थंडी नाही, उकाडा खूप नाही किंवा पाऊस पडत नाही याची खात्री करून घ्यावी लागते.

त्वचारोग, पुटकुळ्या, त्वचेवरील काळे डाग, मस, दद्रू, पांढरे कोड, इसब, अंगावर गांधी उठणे (Urticaria), अंगाला खाज येणे, डोक्यात चाई पडणे, रक्तपित्त, स्त्रीयांमध्ये मासिक पाळीत अंगावरून जास्त जाणे, प्लीहा दोष, गुल्मरोग (वायुगोळा), कावीळ, वातरक्त (गाऊट रोग), मूळव्याध, गुदभाग पिकणे, वारंवार तोंड येणे, तोंडाचा वास येणे, डोळे कायम लाल असणे, लघवीतून रक्त जाणे, अंग जड होणे, अंगाची आग होणे, भूक मंदावणे, अन्न पचतांना जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, तोंड खारट असणे, तहान जास्त लागणे, अंग गळून जाणे, डोकेदुखी, अधिक संतापी स्वभाव, चक्कर येणे, कंप, घाम जास्त येणे, अंगाचा वास येणे, झोप जास्त येणे, अंग दुखणे यासारख्या आजारात रक्तमोक्षण उपयुक्त आहे.


उपकर्मे :

अभ्यंग : शरीराला बाहेरून तेल लावणे म्हणजे अभ्यंगहोय. दिनचर्येतला तो एक महत्वाचा भाग आहे. अभ्यंगामध्ये तेल अंगाला रगडून चोळणे अपेक्षित नाही तर हलक्या हाताने लावणे अपेक्षित आहे.

अभ्यंगाचे गुण सांगणार श्लोक असा –

"अभ्यंगमाचरेत् नित्यं स जराश्रमवातहा ।

दृष्टीप्रसादपुष्ट्यायु स्वप्नसु त्वकदार्ढ्यकृत् ॥"

थोडक्यात अभ्यंगामुळे वात शमन होते, श्रम परिहार होतो, शरीराचे पोषण होते, म्हातारपण दूर रहाते, त्वचेला दृढता येते, बलवृद्धी होते, डोळ्यांची शक्ती वाढते, सहनशक्ती वाढते, झोप शांत लागते, आयुष्यवर्धन होते.

सर्वसाधारणपणे तीन ते पाच मिनिटे प्रत्येक अवयवाला अभ्यंग करावा. अभ्यंगासाठी तीळ तेल किंवा औषधी तेल वापरता येते.

कर्णपूरण : कानात औषधी तेल इ. घालणे याला कर्णपूरण म्हणतात. कर्णपूरणामुळे मान – हनुवटी – कानाचे रोग दूर होतात.

उद्वर्तन : औषधी चुर्णांचे मिश्रण अंगाला चोळणे म्हणजे उद्वर्तन होय. बोलीभाषेत यालाच आपण उटणे लावणे असे म्हणतो. केवळ दिवाळीच्या तीन दिवसातच नव्हे तर वर्षभर उटणे लावता येते किंवा लावावे. उटण्यामुळ कफ दोष कमी होतो, मेद (चरबी) कमी होते, अवयव स्थिर – सुदृढ होतात, त्वचेचे आरोग्य सुधारते. मन प्रसन्न होते. सौंदर्य सुधारते. साबणाला उत्तम पर्याय म्हणजे उटणे.

शिरोभ्यंग : डोक्याला तेल लावणे, मालीश करणे म्हणजे शिरोभ्यंग होय. सध्या डोक्याला तेल न लावण्याची फँशन आलेली आहे. पण शिरोभ्यंग करणे आवश्यक आहे. यासाठी कोमट तेल लावले जाते. शिरोभ्यंग केल्याने शिरोरोग दूर होतात. इंद्रिये कार्यकारी होतात. केस काळे – लांब – मऊ – दाट होतात. डोक्यातील कोंडा, कोरडेपणा कमी होतो.

शिरोधारा : ठराविक अंतरावरून डोक्यावर औषधाची धार काही ठाअविक काळ सोडणे म्हणजे शिरोधार होय. आयुर्वेदावरचे लेख, संकेतस्थळ पहातांना पंचक्र्माच्या नावे जे छायाचित्र ब-याचवेळा दाखविले जाते ते शिरोधारेचे असते. शिरोधारेसाठी औषधी तेल, औषधी तूप, औषधी टाकून उकळलेले दुध, अशा दुधाचे ताक, ऊसाचा रस, औषधी काढा यांचा वापर केला जातो.

वातदोषासाठी शिरोधारेचे औषध सुखोष्ण वापरले जाते आणि पित्त व रक्तदुष्टीसाठी थंड औषधांचा वापर केला जातो. जेव्हा फार कडक ऊन नसते तेव्ह शक्यतो सकाळी सात ते दहा वाजेदर्म्यान शिरोधारा केली जाते. सुमारे ३० मिनिटे ते ४५ मिनिटे रोज या क्रमाने कमीतकमी सात दिवस शिरोधार केली कि चांगला गुण येतो. डोक्यात खवडे होणे, डोक्याची आग होणे, डोक्यावरील जखमा, चक्कर येणे, निद्रानाश, मानसिक ताणतणाव, ओजक्षय, अनेक प्रकारचे कर्णरोग, नेत्ररोग यात शिरोधारा उपयुक्त आहे.

नेत्रतर्पण : उडीदाच्या पिठाने डोळ्याभोवती पाळे तयार करून त्यात काही काळ औषधी घालून डोळे त्या औषधी द्रव्यात बुडवून ठेवणे म्हणजे ‘नेत्रतर्पण’ होय. चष्म्याचा नंबर जास्त असणे, अंधारी येणे, डोळ्यांचा कोरडेपणा, डोळे विकृत होणे, दृष्टी गढुळ असणे, डोळ्यांची उघडझाप करण्यास त्रास होणे, डोळ्याला मार लागणे, डोळ्यातून घाण येणे, पापण्यांचे केस गळणे, डोके दुखणे यांसारख्या आजारात नेत्रतर्पणाने उत्तम गुण येतो.

अग्निकर्म : व्यावहारिक भाषेत ज्याला डाग देणे म्हणतात ते म्हणजे अग्निकर्म होय. अग्निकर्मासाठी सोने – चांदी – तांबे – लोखंड यांची सळई, पिंपळी, मध, गूळ, तेल वगैरे पदार्थांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे जे रोग औषधोपचार, शस्त्रक्रिया यांनी बरे होत नाहीत, त्यात अग्निकर्माने गुण येतो. त्वचा – सिरा – मांस – स्नायू – हाडे – सांधे यातील तीव्र वेदना, स्पर्शज्ञान नसलेल्या – कडक झालेल्या जखमा, गाठी – आवाळू, मूळव्याध, भगंदर, हत्तीपाय रोग, मस, आंत्रवृद्धी (हार्निया) यात अग्निकर्म उपयुक्त ठरते. या रोगांमध्ये योग्य ठरेल असा वरीलपैकी पदार्थ चांगला तापवून डाग दिला जातो.

या उपकर्मांमध्येच मर्दन, शिरोबस्ती, शिरोपिचु, मास्तिष्क्य, क्षारकर्म, धूमपान, गंडूष – कवल धारण या इतर काही उपकर्मांचेही वर्णन आयुर्वेद ग्रंथात विस्तृतपणे आढळते.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.