वैद्य, औषध, सेवक आणि रोगी यांना चिकित्सेचे “ पाद-चतुष्टय “ असे म्हटले जाते. पादचतुष्टय म्हणजे चार पाय ज्यावर उपचारांची यशस्विता अवलंबून असते. या प्रत्येकाचे गुण सांगितलेले आहेत. हे चारही पाय जेव्हा सर्व गुणांनी युक्त असतात तेव्हा चिकित्सा यशस्वी होते. पण जर गुणांमध्ये न्यूनता , कमतरता असेल तर चिकित्ससेच्या यशावर त्याचा परिणाम होतो.

या चारही गोष्टींमध्ये कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे याविषयी सविस्तर वर्णन आयुर्वेदात दिलेले आहे.

  • १) वैद्य : वैद्य, उपचार करणारा डॉक्टर हा दक्ष, शास्त्रांचे अध्ययन केलेला, चिकित्सेतील निरनिराळी कर्मे प्रत्यक्ष पाहिलेला आणि शुचिर्भूत ( स्वच्छ, पवित्र वेष, आचार असणारा ) असावा. पादचतुष्टयातील वैद्य हा महत्वाचा पाद, पाय आहे. कारण सर्व गोष्टींची योजना करणारा सेनापती वैद्यच असतो.
  • २) औषध : औषध हे बहुकल्पी ( वेगवेगळ्या चूर्ण, गोळ्या, काढे यासारख्या कोणत्याही स्वरूपात अनेक कल्प बनविता येईल असे ), बहुगुणी ( अनेक प्रकारचे रोग बरे करण्याचे गुण असलेले, अनेक कार्ये शरीरात करणारे ), संपन्न ( योग्य त्या चवीचे, गुणाचे, खराब न झालेले, चांगल्या जमिनीत वाढलेले ) आणि योग्य ( ज्या रोगावर ज्या अवस्थेत ते हवे आहे तसे कार्य करणारे ) असावे.
  • ३) सेवक / परिचारक ( नर्सिंग ) : वैद्य सोडून चिकित्सेमध्ये जो सेवकवर्ग (नर्स, आया, वॉर्डबॉय इ.) रुग्णाला बरे करण्यास मदत करतो, तो अनुरक्त ( रोग्याशी प्रेमळपणे वागणारे ), स्वच्छता पाळणारा, दक्ष ( आपल्या कामात दक्ष ), बुद्धीमान – चाणाक्ष असावा. रोग्याला धीर देणे, औषधी वेळेवर देणे, रोग्याच्या प्रकृतीत होणारे बदल वैद्याला व्यवस्थित देणे हे सगले सेवक / परिचारक यांवरच अवलंबून असते.
  • ४) रोगी : रोगी हा धनवान ( चिकित्सेसाठी, उपचारासाठी येणारा खर्च करण्याची ऐपत असलेला ), वैद्याचा सल्ला पाळणारा ( वैद्याने सांगितलेली औषधे वेळेवर घेणारा, पथ्य पाळणारा ), ज्ञापक ( निरनिराळे होणारे त्रास, आहारविहारातील बदल, रोगाची सुरूवात कशी, केव्हा झाली हे सांगण्याइतपत ज्ञान असलेला ), सत्त्ववान ( खंबीर मनाचा ) असावा.

हे सगळे चारही पाय गुणांनी युक्त एकत्र जमून आले तर उपचार यशस्वी व्हायला वेळ लागत नाही हे मात्र तेव्हढेच खरे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.