या जगात सगळ्यात वेगवान गोष्ट कोणती तर ती म्हणजे मन. असे हे सैरभैर पळणारे मन या शरीरातच असते. त्यामुळे या दोघांचा एकमेकांवर परिणाम होणे स्वाभाविकच आहे.

एखादी गोष्ट चूक कि बरोबर, योग्य कि अयोग्य, करावी कि न करावी याप्रकारे विचार करणे हे मनाव्दारेच होते. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचज्ञानेंद्रियांमार्फत होणारे ज्ञान जर मन संलग्न असेल तरच होते. कार चालवत असतांना लक्ष जर वाहतुकीकडे असेल तर कारमध्ये चालू असणारे गाणे आपल्याकडून दुर्लक्षित होते किंवा याउलट गाण्यात तल्लीन झाले तर अपघाताला आमंत्रण मिळते हे आपल्या अनुभवातले उदाहरण आहे. थोडक्यात काय तर मनाने चुकीचे निर्णय घेतले, ते भलत्या गोष्टीत रमले तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. सिगारेट, दारू पिणे हे शरीराला वाईट आहे हे माहीत असूनही केवळ मनाच्या मोहापायी त्यांचे सेवन करणे शरीराला त्रासदायक होते. केवळ मनाच्या मोहाला बळी पडून शरीराला पोषक नसणा-या, हानीकारक गोष्टी सेवन केल्या कि त्याचा भुर्दंड मात्र शरीराला पडतो. जेवणाची वेळ झालेली असली आणि भूक लागलेली असली तरी इतर कामे महत्वाची आहेत असा निर्णय मन घेते आणि भरपेट जेवण झाल्यावरही केवळ आवडता पदार्थ आहे म्हणुन पून्हा तो खाण्याचा निर्णयही मनच घेते आणि अशा चुकीच्या निर्णयामुळे शरीर मात्र अन्न पचन न होणे, अँसिडिटी, पोटदुखी, मलावरोध, आव होणे, जुलाब होणे, अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी यासारख्या आणि / किंवा इतरही अनेक रोगांचे माहेरघर बनते.

मन जर शांत नसेल, प्रसन्न नसेल तर योग्य आहारही नीट पचत नाही. संताप, लोभ या मानसभावांमुळे दमा, अम्लपित्त यांसारखे शारिरीक त्रास होतात. जवळचा माणूस गेला तर शोकामुळे किंवा अपघातासारख्या गोष्टीने भयभीत झालेल्या मनामुळे जुलाब, हॄदयविकार यांसारखे शारिरीक विकारही निर्माण होतात.

याउलट शारिरीक रोगांमुळेही मनावर परिणाम होत असतो. खूप दिवसांपासून आजारी असलेला माणूस चिडचिडा होतो. ( चिडणे हे मनाचे लक्षण आहे.) दमा, संग्रहणी यासारख्या चिवट विकारांत हे अवश्य दिसून येते.

आयुर्वेदिक काय किंवा इतर कोणत्याही औषधांनी योग्य गुण येण्यासाठी मानसिक बळही महत्वाचे असते. मनोबल उत्तम असेल तर गंभीर आजारी व्यक्तीही डगमगत नाही आणि मनोबलाच्या जोरावर लवकर बरा होऊ शकतो. मनोबल जर मध्यम असेल तर आजारी व्यक्ती इतरांनी धीर दिल्यावर सावरतो आणि संकटांना, आजाराला समोरा जातो. पण मनोबल कमी असणारी व्यक्ती मात्र छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप बाऊ करतो आणि त्यामुळेच त्याचा आजार बरा व्हायलाही जास्त वेळ लागतो.

सोरायसिस, हृदयरोग, अम्लपित्त, पचनविकार, रक्तदाब जास्त असणा-या व्यक्तींनी मनोबल उत्तम ठेवले तर नक्कीच त्यांचा आजार कमी व्हायला किंवा आटोक्यात राहण्यासाठी मदत मिळेल.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.