१) निरोगी मनुष्याने दररोज ‘ब्राह्म मुहूर्ते’ म्हणजेच पहाटेच्या चार घटका ( भारतीय कालमापन ) म्हणजे ४८ मिनिटे असतांना उठावे. फक्त यावेळी उठतांना आदल्या रात्री केलेले भोजन पचलेले आहे कि नाही हे पहावे. जर पचन झालेले नाही असे वाटत असेल तर पुन्हा निजावे व पचन पूर्ण झाल्यावर उठावे. ( ही बाब म्हणजे कायम स्वरूपीची पळवाट नाही. आदल्या रात्री नेहेमीच असे जड भोजन केले तर लवकरच आजार निर्माण व्हायला सुरूवात होईल.)

आयुर्वेदाने सांगितलेल्या जीवनपद्धतीत सर्व आहार विहारादी नियमांचे पालन निरोगी अवस्थेतच केले तर रोगी अवस्था येण्याचे टळते व रोग प्रतिकारशक्ती शाबूत राहते. आयुष्य अबाधित राहून त्याचे रक्षण घडते.

स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाची शरीर-रचना ही सारखीच असली तरी प्रत्येकाला होणारे आजार मात्र वेगवेगळे असतात. एकाला ज्या औषधांनी १००% गुण येतो त्याच औषधाने मात्र दुस-याला पूर्ण गुण येत नाही असे प्रत्यक्षात दिसते. असे होण्याचे कारण प्रत्येक व्यक्तीची जीवनपद्धत हे आहे. एकाच घरात राहणा-या सगळ्याच सदस्यांची राहणी, कामाचे स्वरूप, खाण्यापिण्याच्या सवयी , आवडीनिवडी, प्रकृती वेगवेगळ्या असतात.

असे वेगवेगळ जीवनपद्धत असणा-या सगळ्यांसाठी काही गोष्टी मात्र कॉमन असतात. त्यानुसार आयुर्वेदाने आदर्श दिनचर्या सांगितलेली आहे.

त्यातला ब्राह्ममुहूर्तावर उठावे हा पहिला मुद्दा आहे.

२) दंतधावन : ब्राह्म मुहूर्तावर उठल्यावर दंत धावन करावे. यालाच आपण दात घासणे / ब्रश करणे असे म्हणतो. दात घासण्यासाठी अर्जुन, निंब, त्रिफळा, वड, रुई, खैरसाल, करंज अशा तुरट, तिखट आणि कडू चव असणा-या झाडांच्या नरम टोकाच्या काड्या दातांनी चावून नंतर त्याने दात घासावेत. सकाळी आणि जेवण केल्यानंतर दंत धावन करण्स अपेक्षित आहे.

सध्याच्या काळात या झाडांच्या काड्या वापरणे सहजशक्य नसले तरी या वनस्पतींची चुर्णे ( पावडरी ) बाजारात उपलब्ध आहेत. पण गोड चवीच्या आणि मीठ घालून तयार केलेल्या टूथपेस्ट कशा दात निरोगी ठेवण्याचे काम कशा करतात हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. तोंडात तयार होणारी लाळ ही बोधक कफाचे एक स्वरूप आहे. आणि रात्रभर तोंडात साठणारा हा कफ नाश करण्यासाठी कफाच्या विरोधी असलेले कडू, तिखट आणि तुरट रस आवश्यक आहेत. कफ वाढविणा-या गोड, आंबट आणि खारट रसाचा उपयोग तर नाहीच, उलट तोटाच अधिक आहे हे दंतविकार तज्ञांच्या दवाखान्यात वाढत जाणा-या गर्दीवरून सहज लक्षात येते.

३) अंजन : दंत धावन झाल्यानंतर डोळ्यात रोज सुरमा घालावा. सुरम्याने डोळ्यांचे आरोग्य टिकून राहते. स्वच्छता पाळून घातलेला सुरमा कधीही त्रास देणार नाही हेच खरे.

४) नस्य : प्रकृतीचा विचार करून त्यानुसार नाकात औषध घालणे म्हणजे नस्य होय. नाक हे डोक्याचे दार आहे असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे. तिळ तेल, गाईचे तूप यांचा वापर आपण नस्यासाठी करू शकतो.

५) गण्डूष : तोंडामध्ये द्रव – तरल पदार्थ ठराविक काळ धरून ठेवणे म्हणजे गण्डूष होय. तोंडात मावेल एव्हढे द्रव द्रव्य (प्रकृतीनुसार गरम पाणी, तिळ तेल, मध, गाईचे तूप इ.) यासाठी वापरता येते. साधारणपणे एक ते दिड मिनिटे द्रवद्रव्य तोंडात धरून ठेवावे. नंतर गुळणी करून बाहेर फेकून द्यावे.

६) धूमपान : धूम म्हणजे धूर. धूर नाकाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे व तोंडाने घेऊन तोंडाने सोडणे यात अपेक्षित आहे. कारण तोंडाने धूर घेऊन नाकाने सोडला तर डोल्यांना त्रास होतो. धूमपानासाठी कंटकारी, निंब, वेखंड यासारख्या वनस्पती घ्याव्यात. सध्या सर्रास वापरल्या जाणा-या तंबाखूयुक्त धुम्रपानाचा अर्थ मात्र धूमपान नाही. आयुर्वेदात सांगितलेला धूमपानविधी आरोग्यासाठी आहे आजार निर्मितीचे कारण ठरण्यासाठी नव्हे. त्यामुळे तंबाखूयुक्त धूम्रपान आयुर्वेद मान्य करणार नाही.

७) ताम्बूल सेवन : ताम्बूल म्हणजेच विडा. धूमपान (धूम्रपान नव्हे) केल्यानंतर षोडशगुणी विडा खावा असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे.

८) अभ्यंग : दररोज संपूर्ण शरीरास तीळ तेलाने मालीश करावी. या क्रियेलाच अभ्यंग म्हणतात. अभ्यंगाने होणारे फायदे – म्हातारपण लांबते, थकवा कमी होतो, वाताचे विकार होण्यापासून रक्षण होते, दृष्टी स्वच्छ होते, शरीरास पुष्टी मिळते, आयुष्य वाढते, झोप चांगली येते, त्वचा मुलायम व तजेलदार होते, शरीर दृढ होते, प्रतिकारशक्ती वाढते.

डोके, कान व पाय यांचे ठिकाणी अभ्यंग करतांना विशेष लक्ष देऊन अभ्यंग करावे. त्यामुळे अभ्यंगाचे फायदे जास्त मिळतात. मात्र कफाचे आजार, अजीर्ण असतांना अभ्यंग करू नये.

९) व्यायाम : ज्यांच्या आहारात स्निग्ध पदार्थ जसे दूध, तूप इ. आहेत अशा व बलशाली व्यक्तीने थंड ॠतूत व वसंत ॠतूत आपल्या शक्तीच्या निम्मे व्यायाम करावा. इतर ॠतूंमध्ये अगदी अल्प व्यायाम करावा. आपल्या शक्तीच्या निम्मे म्हणजे तोंडाने श्वास घ्यावा लागला कि व्यायाम थांबवावा.

व्यायाम केल्याने अंग हलके होते, शरीरात काम करण्यास उत्साह येतो, काम करण्यासाठीचे बळ – शक्ती येते, आहार वाढतो, शरीर पुष्ट – पिळदार - घट्ट होते व पर्यायाने आत्मविश्वासदेखील वाढतो.

व्यायाम सर्वांनी करावा असे मुळीच नाही. अजीर्णासारखे आजार असतांना व लहान मुले व वृद्ध यांनी व्यायाम करू नये.

व्यायामानंतर शरीर रगडून घ्यावे. व्यायाम अतिप्रमाणात केला तर तहान वारंवार लागण्स, वजन कमी होणे, दम लागणे, थकवा, चक्कर येणे, खोकला येणे, ताप – वांती असे आजार होतात.

१०) उद्वर्तन : सर्व शरीराला उटणे लावणे म्हणजे उद्वर्तन होय. उटणे लावण्याने कफ, मेद कमी व्हायला मदत होते. शरीर अधिक बळकट होते, त्वचा स्वच्छ – मृदु होते. साबण लावण्याने त्वचा स्वच्छ होते पण त्वचेला कोरडेपणा येतो. हे टाळण्यासाठी केवळ दिवाळीचे चार दिवसच नाही तर वर्षभर उटणे लावून आंघोळ करणे नक्कीच फायदेशीर आहे.

११) स्नान : ऊन पाण्याने ( ॠतूनुसार सोसेल एवढेच गरम पाणी ) आंघोळ करावी. ऊन पाणी गळ्याखालून स्नान करण्यास वापरल्यास शक्ती वाढते. मात्र डोक्यावरूनही ऊन पाणी घेतल्याने केस आणि डोळे यांना हानी पोहोचते. म्हणून डोक्यावर गार पाणी ( बाहेरच्या वातावरणानुसार तापमान असलेले गार पाणी) घ्यावे. गळ्याखाली ऊन पाणी वापरावे.

स्नान केल्याने शरीरावर असलेला मळ, शरीरास येणारी खाज, थकवा, ग्लानी, तहान जळजळ, दुर्गंधी आणि पाप यांचा नाश होतो. स्नानाने आयुष्य, शारीरिक बळ, तेज आणि वृष्यत्व प्राप्त होते. रोज स्नान केल्याने हे फायदे प्राप्त होतात.

स्नान केव्हा करू नये याचेही वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. पक्षाघात झालेलाअसतांना, डोळ्याम्चे आजार – तोंडाचे आजार – कानाचे आजार , अतिसार – जुलाब, पोट फुगणे, सर्दी, अजीर्ण अस आजार असतांना स्नान करू नये.

स्नान झाल्यावर जुने. मळके, लाल रंग असलेले व फाटके कपडे घालू नये. स्वच्छ, नीटनेटके कपडे घालावेत. दुस-याने वापरलेले वस्त्र, पुष्पमाला आणि पादत्राणे ( चपला ) वापरू नयेत.

१२) उपजीविक, अर्थप्राप्ती करावयाचे प्रयत्न : वरील सर्व शुचिता झाल्यानंतर धन मिळविण्यासाठी आपला धंदा, व्यवसाय किंवा नोकरी असल्यास त्या त्या कामास लागावे. शेती, व्यापार, गोपालन, शासकिय नोकरी किंवा अशी दुसरी धन मिळविण्याची क्रिया करावी. इहलोक आणि परलोक यांत निषिद्ध नसलेली किंवा जी क्रिया केल्याने कुणाचेही नुकसान होणार नाही अशाच सर्वमान्य पद्धतीने धन मिळवावे. सत्कार्य करून द्रव्य – धन मिळवावे. असे नियमदेखिल आयुर्वेदाने वर्णन केलेले आहे.

१३) अन्नपान विधी : अन्न सेवन म्हणजेच जेवण कसे कसे करावे याचे विस्तृत वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. अन्न ग्रहण करतांना स्वयंपाकाची प्रशंसा करावी. अन्नाची किंवा अन्न तयार करणा-याची निंदा करू नये. प्रसन्न मनाने, कोणाशी न बोलता व शांत वातावरणात जेवण करावे ( सध्या टीव्हीसमोर कर्णकर्कश्श आवाजात, भांडणे-मारामारी-द्वेष-मत्सर यांचा भरणा असणारे कार्यक्रम पाहत जेवण करणे कितपत उचित होईल ?) जेवतांना वाचन, गप्पा या गोष्टी टाळाव्यात.

आहाराची मात्रा ठरवतांना प्रत्येकाची आहार पचविण्याची शक्ती भिन्न असल्याने आपल्या जठराचे तीन भाग कल्पून एक भाग अन्न, एक भाग जल आणि एक भाग पचनात महत्वाचे काम बजावणा-या दोषांची जागा राखून जेवण घ्यावे. एका ठराविक नियमात शरीराला प्रत्येकवेळी बसविता येत नाही. त्यामुळे इतके मिलिग्रँम प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस, कँल्शियम रोज खाल्लेच पाहिजे असा नियम प्रत्येकाला लावून चालत नाही.

जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिणेच योग्य आहे. जेवणापूर्वी / जेवणानंतर निरोगी माणसाने पाणी अयोग्य आहे.

आहार आपल्या शरीराचे पोषण करीत असतो व त्याचमुळे त्याकडे लक्ष देवून व नियम पाळून त्याचे सेवन अत्यावश्यक आहे. केवळ आपला आहार व्यवस्थित केला आणि आपल्या जीवनशैलीत ठोडेफार बदल केले तरी बरेचसे साध्य व्याधी विना औषधी बरे होऊ शकतात.

आयुर्वेदानुसार आजार निर्मितीत अयोग्य आहार आणि विहार यांचा मोठा हात आहे. त्यामुळेच या गोष्टी निरोगता टिकविण्यासाठी योग्यरित्या होणे पुढचे नऊ टाके वाचविणार आहे.

काही आवश्यक आणि महत्वाचे :

पंधरवाड्यातून कमीतकमी तीनदा दाढी – नखे कापावीत. वेळच्यावेळी डोक्यावरचे केस कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. स्वतःच्या हाताने केस किंवा दातांनी नखे कापू नयेत. न्हाव्याकडून केस कापून घ्यावेत.

काही कारणास्तव घराबाहेर जायचे असेल तर कल्याणकारी गुरू, माता, पिता इ. पूज्य व्यक्ती आणि तूप यांना हाताने स्पर्श करूनच बाहेर पडावे. ( पूज्य व्यक्तींना नमन करून जावे )

पूत्र किंवा शिष्य यांच्याशिवाय इतर दंड देण्यालायक असतील तरी त्यांना शिक्षा करू नये. नाचणे, गाणे, संगीत यात सदा मग्न राहू नये. केस व्यवस्थित विंचरलेले ठेवावेत. आपली भाषाशैली गोड, दुस-याला आवडेल अशी ठेवावी. आपला वेश नेहेमी स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. नेहेमी शांत असावे. उगाच चिडचिड करू नये.

तोंड पुष्कळ उघडून ( आ वासून ) हसणे, ढेकर देणे, शिंकणे किंवा जांभई देणे या क्रिया करू नयेत. या गोष्टी करतांना आपल्या तोंडावर हात ठेवावा. दोन्ही हातांनी डोके खाजवू नये. डोक्यावर जड वजन / वस्तू उचलू नयेत. कारणाशिवाय नाक शिंकू नये. उगाचच चाळा म्हणून बसल्याबस्ल्या जमीन उकरू नये.

कारण असेल वा नसेल तरी मुख, अवयव वा नखांअचे आवाज करू नये. पायावर पाय चढवून बसू नये. एका पायाने दुस-या पायाला खाजवणे, धुणे इ. क्रिया करू नयेत. नख, पाय इ. वारंवार मलीन होणारे भाग स्वच्छ ठेवावेत.

हलणा-या वस्तू, बारीक वस्तू व न आवडणा-या वस्तू ( बीभत्स, वाईट गोष्टी) सारख्या पाहू नयेत. चांगल्या नसलेल्या वस्तू व स्थान, मल किंवा तसेच मलीन आरसा याकडे पाहू नये. उदय होत असलेला किंवा अस्ताला जात असलेला सूर्य वा माध्यान्हीचा तापलेला सूर्य कपड्यांच्या आडूनदेखील पाहू नये. अतिशय तेजस्वी / प्रकाशमान इतरही वस्तू पाहू नयेत.

पूर्व दिशेचावारा, ऊन, धूळ, धूर, दव, धुके, वादळ यांपासून आपले संरक्षण करावे. शरीर विषम अवस्थेत, सरळ नसतांना शिंक, ढेकर, झोप, भोजन, मैथुन करू नये. आवाज करून चारचौघात अपान वायूचा (गँसेस) त्याग करू नये.

संध्याकाळी व प्रातःकाळी स्त्रीसंभोग, निद्रा घेणे, भोजन करणे या गोष्टी करू नयेत. हिंसा, चोरी, बलात्कार, दुस-याची त्याच्या अपरोक्ष निंदा, बदनामी करणे, खोटे बोलणे, दुस-यास वाईट वाटेल असे बोलणे, दुस-याचे वाईट चिंतणे, दुस-याच्या धनाचा लोभ करणे, शास्त्राविषयी अनादर किंवा नास्तिकता दाखविणे यांचा काया - वाचा – मनाने त्याग करावा.

या व अशा कितीतरी गोष्टी, नियम हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या आयुर्वेद ग्रंथात सविस्तर वर्णन केलेल्या आहेत. प्रत्येकाचे कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केला तरी प्रत्येकाचेच उत्तर सापडेल असे नाही. आपली संस्कृती, आपले राहणीमान यापेक्षा वेगळे नाही. आयुर्वेद आपल्या जीवनशैलीचाच एक भाग आहे. मात्र आज आयुर्वेदाकडे फक्त एक उपचार पद्धती एव्हढ्याच संकुचित दृष्टीने पाहिले जावे ही खरंतर खेदाचीच बाब आहे.

विविध देश आणि कितीतरी संशोधक आयुर्वेदाचे संशोधन करत असले तरी आयुर्वेदाने दिलेले अलौकिक ज्ञान आपले कल्याण करण्यास समर्थ आहे.

आपले शास्त्र, आपली ओळख, आपली संस्कृती आपणा सर्वांचा अभिमान आहे. कुणीतरी बाहेरून येऊन आपल्याला ‘एटिकेटस्’ शिकवावे इतपत आपली संस्कृती नक्कीच मागसलेली नाही एवढे मात्र खरे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.