कोणताही आजार असला तरी त्याचे योग्य निदान झाल्याशिवाय त्यावर उपाय करता येणे शक्य नाही. एवढेच नाही तर असे करणे त्या रोग्यावर अन्याय आहे.

आयुर्वेदानुसार ‘निदान’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. निदान म्हणजे १) रोगाचे ज्ञान आणि २) रोगीचे हेतू / रोगाची कारणे. यापैकी रोगाचे ज्ञान होण्यासाठी रोगाचे हेतू किंवा कारणे काय आहेत ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

आयुर्वेदाने रोगाच्या कारणांचे वर्गीकरण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केलेले आहे.

१) असात्म्येन्द्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम अशी रोगाची तीन कारणे

 • अ) असात्म्येन्द्रियार्थ संयोग : असात्म्य म्हणजे शरीराला न सोसणारे, सहन न होणारे. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ या पाच ज्ञानेंद्रियामार्फत ज्या विषयांचे ज्ञान होते त्या विषयांना अर्थ म्हणतात. शब्द , गंध (वास), रूप, स्पर्श आणि रस (चव) हे पाच अर्थ आहेत. या अर्थांचा त्यांच्या इंद्रियांशी सहन होणार नाही, सोसणार नाही असा संयोग म्हणजे असात्म्येन्द्रियार्थ संयोग होय. हा तीन प्रकारचा असतो. अयोग (अजिबात संयोग न होणे), अतियोग (अतिप्रमाणात संयोग) आणि मिथ्यायोग (चुकीचा, विकृत संयोग). सोप्या भाषेत याचे उदाहरण देता येईल ते असे – कारखान्यात सतत कर्कश आवाज कानावर पडत असणे हा कानाचा अतियोग. खूप वेळ टीव्ही पहात बसणे हा डोळ्यांचा अतियोग. तिखट अजिबात सहन होत नाही तरी तिखट पदार्थ खाणे हा जीभेचा मिथ्यायोग इ. यामुळे रोगनिर्मिती सुरू होते.
 • ब) प्रज्ञापराध : प्रज्ञा म्हणजे बुद्धी, धारणाशक्ती, स्मरणशक्ती. हिच्यामार्फत अपराध होणे म्हणजे प्रज्ञापराध होय. आपल्याला हितकर काय, अहितकर काय याचा निर्णय घेणे, त्यापासून स्वतःला दूर ठेवणे, पूर्वी केलेल्या अहितकर – त्रासदायक गोष्टींचे स्मरण ठेवून त्या अहितकर गोष्टी टाळने ही प्रज्ञेची कामे आहेत. पण त्यात बिघाड झाला कि रोगनिर्मिती सुरू होते. उदा. सिगारेट, मद्य वाईट आहे हे माहीत असूनही त्यांचे सेवन करणे, अत्यधिक मैथुन – अतिव्यायाम – सदाचार न पाळणे – हरभरा डाळ आपल्याला त्रासदायक आहे हे माहीत असूनही त्यांचे सेवन म्हणजे प्रज्ञापराध. प्रज्ञापराध हा नकळत न होता जाणूनबुजून होत असतो.
 • क) परिणाम : परिणाम म्हणजे काळाचे अयोग, अतियोग, मिथ्यायोग होय. उदा. हिवाळ्यात कमी थंडी पडणे हा अयोग, अति थंडी पडणे हा अतियोग आणि हिवाळ्यात पाऊस पडणे हा मिथ्यायोग. या प्रकारच्या गोष्टींनी रोग निर्मिती सुरू होते.

२) दोषहेतू, व्याधी हेतू आणि उभय हेतू ही तीन रोगांची कारणे

 • अ) दोष हेतू : वात, पित्त आणि कफ या दोषांना बिघडविणारी कारणे म्हणजे दोषहेतू. उदा. आंबट पदार्थांनी पित्त वाढणे, गोड रसाने कफ वाढणे.
 • ब) व्याधी हेतू : उदा. माती खाल्ल्याने पाण्डूरोग होतो. माती खाणे हा पाण्डूरोगाचा मुख्य हेतू आहे. माती खाल्ल्यावर आधी दोष बिघडतात आणि नंतर पाण्डूरोग ह्तो हे खरे असले तरी माती खाल्ल्यावर पाण्डूरोगच होतो. म्हणून माती खाणे हा पाण्डूरोगाचा व्याधी हेतू होय.
 • क) उभय हेतू : वरील दोन्ही दोष हेतू आणि व्याधी हेतू म्हणजे उभय हेतू होय. वेगवान वाहनाने प्रवास करीत असतांना हादरे बसून वातरक्त हा व्याधी होतो. यात प्रवासामूळे वातदोषही बिघडतो आणि वातरक्त हा रोगही होतो म्हणून प्रवास हा वातरक्त व्याधीचा दोषहेतूही आहे आणि व्याधी हेतूदेखिल आहे.

३) बाह्य आणि अभ्यंतर हेतू ही रोगाची दोन कारणे आहेत.

 • अ) बाह्य हेतू : आपला आहार, आचरण, बाह्य वातावरणातील बदल यामुळे रोग होतात ते बाह्य हेतू.
 • ब) अभ्यंतर हेतू : आपल्या शरीरात असलेले वात, पित्त आणि कफ हे दोष, रस-रक्त-मांस आदी धातू, मल – मूत्र हे बिघडून रोग निर्माण होतात. म्हणून यांचे बिघडणे हे अभ्यंतर हेतू होय.

४) सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक हे चार हेतू रोगांची कारणे आहेत.

 • अ) सन्निकृष्ट हेतू : सन्निकृष्ट म्हणजे जवळचे, तत्कालिक कारण. उदा. सकाळी कफ वाढणे, दुपारी पित्त वाढणे आणि सायंकाळी वात वाढणे. जेवल्यावर कफ वाढणे, मग पित्त वाढणे आणि पचन पूर्ण झाल्यावर वात वाढणे. दोषांचा शरीरात थोड्या काळासाठी संचय होऊन दोष प्रमाणापेक्षा जास्त वाढून त्यांचा प्रकोप होणे ही अवस्था मात्र येथे नसते.
 • ब) विप्रकृष्ट हेतू : दूरचा हेतू, कारण, खूप आधी घडलेला हेतू किंवा कारण म्हणजे विप्रकृष्ट हेतू. उदा. उन्हाळ्यात कोरडेपणा निर्माण झालेला असल्याने शरीरात वात संचित होतो, परंतु उन्हाच्या उष्णतेने तो कुपित होत नाही. पण नंतर पावसाळ्यात पडणा-या पावसामूळे गारवा वाढतो आणि मग उन्हाळ्यात साठलेला वात कुपित होतो.
 • क) व्यभिचारी हेतू : रोग उत्पन्न होण्याची कारणे जेव्हा दुर्बल असतात तेव्हा ती कारणे रोग उत्पन्न करू शकत नाहीत. त्यांना व्यभिचारी हेतू असे म्हणतात. ड) प्राधानिक हेतू – जी कारणे तात्काळ रोग उत्पन्न करतात, शरीरात लक्षणे उत्पन्न करतात त्यांना प्राधानिक हेतू म्हणतात. उदा. विषसेवन या कारणाने लगेच लक्षणे दिसतात.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.