आयुर्वेदाविषयी भारतात आणि परदेशातही बरेच समज – गैरसमज आहेत. त्यापैकी काही समज - गैरसमजांविषयी विस्ताराने विचार करणे सध्याच्या काळात खूप आवश्यक आहे.


आयुर्वेदिक औषधात Heavy Metals असतात. त्यामुळे किडनी खराब होते….

आजपर्यंत आयुर्वेदाच्या इतिहासात याहून मोठा विनोद निर्माण झालेला असेल असे वाटत नाही. हजारो वर्षांपासून आयुर्वेद घरोघरी वापरला जातोय आणि असे आयुर्वेदिक औषधे घेतल्याने त्या घरातील लोकं पटापट किडनी विकाराने त्रस्त आहेत किंवा मृत्युमुखी पडत आहेत असे चित्र कधीही कुठेही पहायला मिळालेले नाही आणि मिळणारही नाही.

गेल्या २५ – ३० वर्षांपासून हा गैरसमज का पसरला ( किंवा का पसरविला गेला ?) ? ही संशोधनाची गरज नसलेला विषय आहे यात शंका नाही.

आयुर्वेदात सोने, तांबे, लोह, चांदी अशा धातूंची भस्मे वापरली जातात हे खरे आहे. पण ते वापरतांना सोन्याची भूकटी केली आणि दिली रोग्याला अशी वस्तुस्थिती नाही. सोने ( किंवा इतर सर्व धातू, प्राणिज पदार्थ) औषध म्हणुन वापरतांना त्यावर आयुर्वेदातील ग्रंथामध्ये दिलेल्या भस्मीकरणासारख्या विशिष्ठ प्रक्रिया करणे आवश्यक असते. या प्रक्रियांमध्ये एक विचार दडलेला आहे. तो म्हणजे निरिन्द्रिय असलेल्या गोष्टींचा सेन्द्रिय पदार्थाबरोबर संयोग करून निरिन्द्रिय वस्तूत सेन्द्रियत्व निर्माण करणे. म्हणुनच कोणत्याहे धातूचे, प्राणिज पदार्थाचे भस्म बनवितांना, औषध बनवितांना त्याला विविध वनस्पतींच्या भावना देणे, पुट देणे, शोधन करणे, मारण करणे या क्रिया केल्या जातात. त्यामुळे अंतिमतः प्राप्त होणा-या औषधात सेन्द्रियत्व निर्माण होते आणि या सेन्द्रिय शरीराकडून त्या औषधाचा स्विकार सहज केला जातो.

आता बाजारात मिळणा-या आयुर्वेदिक औषधांमुळे रोग्याच्या किडनीत प्रेसिपिटेशन का होते हा खरा संशोधनाचा विषय असू शकतो. बाजारीकरणाच्या परिस्थितीमुळे कैक कंपन्या भस्मे बनवितांना, औषधे बनवितांना ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या प्रक्रिया करतच नाहीत किंवा यथायोग्य करीत नाहीत. त्यामुळे अशा तयार झालेल्या औषधांनी काही त्रास झाला तर त्यात दोष आयुर्वेदाचा आहे कि औषधे बनविणा-याचा हा विचार आवश्यक आहे. अजुनही काही कंपन्या शास्त्रोक्त, ग्रंथोक्त पद्धतीने औषधी बनवितात हेही तितकेच खरे आहे आणि त्यामुळेच आम्ही वैद्य वर्ग आयुर्वेद व्यवसाय यशस्वीपणे करू शकतो आहोत.

पण एक केस सापडली कि लगेच पूर्ण आयुर्वेद शास्त्रालाच बदनाम करायचा जो काही घाट काहींकडून घातला जातो आहे त्यात नुकसान आयुर्वेदाचे आणि पर्यायाने आपल्या देशाचेच आहे यात शंका नाही. अख्खे जग आयुर्वेदाकडे उत्सुकतेने आणि विश्वासाने पाहत असतांना काही घरभेदी घर खराब करीत असतील तर काय करावे ?

आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्टस् (side effects) नसतात. त्यामुळे एकाचे औषध दुस-याने घेतले तरी चालते...

एखाद्या विशिष्ट आजारावर विशिष्ट औषध दिले जाते. परंतु आजार बरा करतांना ते औषध शरीराला अहितकर असे काही परिणाम करते. त्यानांच आपण दुष्परिणाम, साईड इफेक्ट असे म्हणतो. योग्य निदान, योग्य औषध व योग्य मात्रा, थोडक्यात proper diagnosis, proper medicine and proper dose असेल तर आयुर्वेदिक औषधांना दुष्परिणाम नसतात हे शंभर टक्के खरे आहे. उदाहरण घ्यायचे तर अपचनाचा त्रास आहे, कफाची प्रकृती आहे, आव साठलेली आहे आणि असे असतांना चांगल्या प्रतीचा हिंग जर योग्य मात्रेत घेतला तर अपचन कमी होईल आणि इतर काहीही दुष्परिणाम दिसणार नाही. पण निदानच चुकीचे आहे, पित्ताचा अपचनात संबंध आहे आणि तरी हिंग घेतला तर त्यामुळे जर पित्त जास्त वाढले तर तो दुष्परिणाम हिंगाचा आहे असे म्हणायचे कि चुकीच्या ठिकाणी हिंग खाणा-राचा ? त्यामुळेच हे स्पष्ट आहे कि योग्य निदानानंतर योग्य मात्रेत योग्य आयुर्वेदिक औषध साईड इफेक्ट दाखवित नाही.

पण म्हणून एकाचे औषध दुस-याने घेतले तरी चालते हे मात्र चुकीचे आहे. आयुर्वेदिक औषध रोग्याला देण्यापूर्वी योग्य निदान करणे आवश्यक आहे. कारण एकाच व्यक्तीला एकच रोग वेगवेगळ्या वेळी झाला तरी रोग होण्याच्या कारणानुसार, ॠतूनुसार, लक्षणांनुसार, व्यक्तीच्या वयानुसार औषधात बदल करावा लागतो. मग वेगवेगळ्या प्रकृती असलेल्या दोन व्यकतींना एकच रोग असला तरी एकच औषध कसे लागू पडेल ? उदाहरणार्थ दोन व्यक्तींनी सारखे जेवण घेतले आणि त्यातील एकाला पोटात गँसेस, गुबारा, जडपणा असे त्रास होत असले आणि दुस-याला जळजळ, चक्कर येणे, पित्त असे त्रास होत असतील तर पहिल्या व्यक्तीला वापरलेले हिंग, ओवा, क्षारयुक्त पाचक औषध दुस-याने घेतले तर त्याची जळजळ वगैरे लक्षणे कमी न होता वाढणारच आहेत. याला आपण दुष्परिणाम म्हणू शकतो. पण हे दुष्परिणाम आयुर्वेदिक औषधांचे नाहीत तर ते देणा-याचे किंवा घेणा-याचे आहेत हेही तितकेच खरे. हातात धरलेल्या आगकाडीने फुलवात पेटवायची कि फटाका हे योग्य मार्गदर्शकच सांगू शकेल नाही का ?

आयुर्वेदिक औषधे घेतांना खूप पथ्य पाळावी लागतात...

एक साधे उदाहरण आहे कि नळाखाली ठेवलेले भांडे जर पाण्याने भरत आले असेल आणि ते भांडे भरू नये अशी इच्छा असेल तर नळ ताबडतोब बंद करावा लागेल. त्याचप्रमाणे एखादा आजार होऊ घातला असेल तर तो होऊ नये किंवा वाढू नये असे वाटत असेल तर त्या आजाराची कारणे बंद करावी लागतील.

आयुर्वेदानुसार आजार उत्पन्न होण्याला बहुतेक वेळा आपला आहार विहारच जबाबदार असतो. आजार बरा व्हायला मदत करणारा आहार विहार म्हणजे पथ्य आणि आजार वाढायला मदत करणा-या गोष्टी म्हणजे अपथ्य होय. ( पथ्यापथ्याविषयी अधिक माहिती वाचा….) त्यामुळे जोपर्यन्त आजारास कारणीभूत ठरणारा आहारविहार टाळला जाणार नाही, तोपर्यंत रोगाची वाढ थांबणार नाही.

कोणतीही गोष्ट अति केली कि त्रास होतो. अति प्रमाणात खाणे जसे त्रासदायक आहे तसे अति लंघन ( उपवास ) करणेही त्रासदायकच आहे. Infection मुळे जुलाब होतात, सर्दी होते, ताप येतो, अजुनही बरेच त्रास होतात. जंतूंमुळे रोग होतच नाहीत असे आयुर्वेदाचे म्हणणे नाही. पण मग ज्याला infection झाले, त्रास झाला त्याच्या आजुबाजुच्या लोकांना का त्रास झाला नाही ? याचे उत्तर हेच कि ज्याला त्रास झाला त्याच्या आहारविहारामुळे त्या जंतूंना त्याच्या शरीरात वाढायला, रोग निर्माण करायला अनुकूलता होती म्हणून त्रास झाला.

आयुर्वेदाने सांगिमलेली पथ्यापथ्य कायम पाळावी लागतात का ? नाही, कायम नाही. रोग पूर्ण बरा होऊन शरीर आयुर्वेदाने सांगितलेल्या स्वस्थच्या व्याख्येप्रमाणे पूर्ण निरोगी झाले कि पथ्यापथ्य शिथिल करण्यास हरकत नाही. पण शिथिल किती ? तर पुन्हा रोग व्हायला वाव मिळणार नाही इतकी. कारण एक थेंब दही लिटरभर दूधाचे दही बनवायला पूरेसे होते तसे...

आयुर्वेदाने गुण यायला बराच वेळ लागतो...

एखादे छोटेसे रोपटे उपटायला कमी कष्ट लागतात, पण त्याच रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाल्यावर तो वृक्ष उपटून काढणे सहज शक्य होते का ? त्याचप्रमाणे रोग नवीन असेल तर बरा व्हायला वेळ कमी लागतो आणि त्यासाठी कोणतीही पँथी वापरली तरी हा वेळ कमीच असतो…अगदी आयुर्वेदही.. मात्र सगळे प्रयत्न करून झाले कि, रोग जुनाट झाला कि आयुर्वेदाकडे वळलेले लोक सात पंधरा दिवसांत कायमचा गुण यावा म्हणुन आग्रह धरतात. वैद्य हा जादुगार नाही आणि आयुर्वेद ही जादू नाही हे वास्तव आहे. त्या वैद्याला, त्याने दिलेल्या औषधाला काही काळ, काही वेळ काम करण्यासाठी दिला तर रोपट्याचा झालेला वृक्ष उपटून काढता येईल. पण विचार कोण करतो ? नुकताच झालेला रोग ज्यांना असेल त्यांनी आयुर्वेदिक औषधे वैद्यांमार्फत घेतली कि लगेच गुण येतो हेही तितकेच खरे आहे. पण रोग निर्माण होऊन खूप दिवस झाले असतील, त्यात त्या शरीरामध्येही गुंतागुंत वाढलेली असेल, तर त्रास कमी व्हायला वेळ लागणारच ना ?

रोग्याचे वय, प्रकृती, रोगाचे स्वरूप, काळ, दोष, धातू, अवयव, रोगाची कारणे, रोगासाठी घेतलेला औषधोपचार, औषधांचे गुणदोष, वैद्याचे कसब, रोग्याचे मानसिक बळ, पथ्यापथ्य, उपचाराबद्दलचा रोग्याचा मनोनिग्रह, वैद्यावरचा विश्वास या सगळ्या गोष्टींवर रोग बरा व्हायला किती वेळ लागणार आहे हे ठरते.

आयुर्वेद म्हणजे जडी – बुटी, झाडपाल्याची औषधे होय...

प्रत्येक वैद्यकशास्त्र हे काम करते ते आपल्या निदान पद्धती आणि औषधांच्या सहाय्याने… आयुर्वेदात औषध म्हणुन वेगवेगळ्या वनस्पती प्राधान्याने वापरल्या जातात. मात्र केवळ वनस्पतीजन्य औषधेच आयुर्वेदात आहेत असे मात्र नाही. विविध प्राणीज पदार्थ, सोने, तांबे, पारा यासारखे धातू यांचाही औषध म्हणुन आयुर्वेदात वापर केला जातो. इतकेच नाही तर आयुर्वेदाचा सिद्धांतच आहे कि या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट औषध म्हणुन वापरता येते. फक्त ते वापरतांना तारतम्या वापरायला हवे. ती वस्तू शरीरात सहजपणे सामावली जावी यासाठी त्यावर काही प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. आणि या प्रक्रिया म्हणजे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. केवळ एखादा पदार्थ पोटातून देणे म्हणजे औषध नाही. तर एकही पदार्थ न वापरताही उपचार करता येतात, उपचार होऊ शकतात या मताचा आयुर्वेद आहे. उदाहरणार्थ लंघन म्हणजे उपवास आणि या लंघनाने ताप कमी होतो. अशी अद्रव्यचिकित्सा हेही आयुर्वेदाचे वैशिष्ट्यच आहे.

वनस्पतींचा वापर आयुर्वेदात असला तरी वनस्पती म्हणजे आयुर्वेद असे म्हणणे चुकीचे आहे. थोडक्यात प्रत्येक हर्बल औषधे आयुर्वेदिकच आहेत असे नाही आणि असे म्हणणे म्हंणजे शुद्ध फसवेगिरी आहे. एखादा वैद्य काविळीवर किंवा मूळव्याधीवर वनस्पतीजन्य औषध देत असल्यास त्या वैद्याला इअतर सर्व आजारांवरही औषध देता यायला अह्वे. कारण एक आजार आणि एक औषध असले तोडगे या स्वरूपात आयुर्वेदाचे वर्णन नाही. आयुर्वेद हे एक शास्त्र आहे आणि या शास्त्राचा सर्वांगीण अभ्यास ज्याने केलेला आहे तोच खरा वैद्य. यातून सुज्ञांनी योग्य तो बोध घ्यावा हा आग्रह. आणि असा बोध झाला तर हे संकेतस्थळ बनविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असे म्हणता येईल.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.