कोणत्याही बालवाडीच्या बाहेर शाळा सुटल्यानंतर लहान लहान चिमणी मुलं चिवचिव करीत आपल्या आईबरोबर बाहेर पडतात. त्यावेळेस एकतर बाळ आईचा हात धरून आईबरोबर चालत असते किंवा पदर पकडून मागे मागे चालत असते. या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येईल कि, बाळाला जशी आईची गरज असते तशीच गरज आईलाही बाळाची असते. आपल्या सोनुल्याला पाहिल्यानंतर आईचा चेहरा टवटवीत होतो. बाळ जरी लहान असले, स्वतः विशेष काहीही करीत नसले तरी त्याच्या केवळ अस्तित्वामुळे फरक पडत असतो तो त्याच्या आईला.

काहिसा हाच प्रकार आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीतही आढळतो. आयुर्वेदिक डॉक्टर म्हटला कि एक समजूत आहे कि तो भारंभार पथ्य सांगणार आणि गोळ्या, पावडर एखाद्या कडू – पातळ औषधाबरोबर किंवा तूप - अमधातून घ्यायला लावणार. पण कोणत्याही वैद्याला कडू काढे रोग्याला पाजण्यात आनंद नसतो. पण रोग लवकर बरा व्हावा म्हणुन ते आवश्यकही असते. यातील पथ्याबरोबरच महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे मुख्य औषधाबरोबर घेतले जाणारे काढे, तूप, मध हे प्रकार म्हणजे "अनुपान".

'अनु-सह पश्चात् वा दीयते इति अनुपानम् ।' अशी अनुपानाची व्याख्या आहे. याचा अर्थ असा कि मुख्य औषधाबरोबर किंवा पाठोपाठ दिले जाते ते अनुपान.

अनुपान म्हणुन दिलेल्या औषधाचे काम म्हणजे स्वतःच्या गुणधर्मांनी रोग बरा करण्यास मदत करणे आणि त्याजोडीलाच मुख्य औषधांचे गुणधर्म कैक पटीने वाढविणे. थोडक्यात it works as a catalyst. या आनुपानाच्या कार्याबरोबर काही अनुपाने मुख्य औषधांची चव सुसह्य करण्यासाठीही मदत करतात. काही उदाहरणांवरून ही अनुपानाची कामे लक्षात येतील. ताप आलेला असतांना तापावरची औषधे तुळशीचा रस, आल्याचा रस, मध किंवा गरम पाणी यांसारख्या अनुपानांसोबत दिली जातात. जुलाब करविण्यासाठी दिलेली औषधे गरम पाणी, सुंठ टाकून उकळलेले पाणी, बडिशेपेचा अर्क यासोबत देतात. त्यामुळे मुख्य औषधांचा पोटात मुरडा मारून जुलाब होणे हा दुष्परिणाम कमी होतो. सर्दी खोकल्याची औषधे आल्याचा रस – मध किंवा तुळशीच्या रसातून दिलीतर लवकर गुण येतो. अन्क आयुर्वेदिक काढे, आसव – अरिष्टे (दशमूलारिष्ट, कुमारीआसव इ.) ही अनुपान म्हणुन आणि रोगावरचे औषध म्हणुनही खूप उपयुक्त आहेत. याचबरोबर अनुपानाचे काम म्हणजे मुख्य औषध पचण्यासाठीही ते मदत करते.

म्हणुन औषध कशाबरोबर घ्यायचे आहे हे प्रत्येक रोग्याने व्यवस्थित पाळले पाहिजे. मूल नसलेली स्त्री जशी नेहेमी उदास असते तसेच आईविना असलेले मुलही पोरके असते. म्हणुनच आई – मूल ही जोडी जशी आवश्यक तशी मुख्य औषध – अनुपान ही जोडीही आयुर्वेदात महत्वाची आहे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.