शरीराचे पोषण होणे, वाढ होणे हे प्रामुख्याने अन्नपाण्यावर अवलंबून असते. परंतु हे पदार्थ खाल्ले कि जसेच्या तसे शरीरात शोषले जात नाहीत, तर त्यांच्यावर पचनाची क्रिया होऊन शरीर घटकांसदृश्य घटकांमध्ये त्यांचे रूपांतर होते आणि मग ते शरीरत शोषले जाऊन मग शरीराचे पोषण होते. हे रूपांतर ज्या गोष्टींमुळे होते ती गोष्ट म्हणजे "अग्नि".

गव्हाच्या पिठाची कणीक नुसती मळून खाल्ली तर ती सहजासहजी पचणार नाही. पण तीच तव्यावर भाजून पोळीच्या स्वरूपात खाल्ली तर सहज पचते. इथेही अग्निच्या सहाय्यानेच पोळी पचायला हलकी होते. त्याप्रमाणेच शरीरातील अग्नि आहारावर पचनक्रिया करून शरीर पोषक भाग / अंश तयार करतो. म्हणुनच अग्निला खूप महत्व आहे.

"शांतेऽग्नौ म्रियते ।" म्हणजेच अग्नि शांत झाला कि माणूस मरतो. या अग्निच्या कार्यात काही बिघाड झाला कि दोषप्रकोप होऊन रोग उत्पन्न होतात. म्हणजेच अग्निच्या स्थितीवर शरीर अवलंबून आहे. आयुर्वेदानुसार "रोगाः सर्वेऽपि मंदेग्नौ ।" म्हणजेच जवळजवळ सर्वच रोग हे अग्नि मंद झाल्यामुळे होतात, असे म्हटले जाते.

आयुर्वेदनुसार आपल्या शरीरात एकुण १३ प्रकारचे अग्नि कार्य करतात. जो आहार आपण सेवन करतो, त्या अन्नाचे पचन करून पोषक रसात रूपांतर करणारा तो मुख्य अग्नि म्हणजे पाचकाग्नि, रसरक्तादी सात धातूंचे सात अग्नि आणि पंचमहाभूतांचे पाच अग्नि असे एकुण १३ ( तेरा ) अग्नि आहेत. यापैकी कुठलाही अग्नि बिघडला कि शरीराला पोषक घटक न मिळाल्याने शरीर व्यापारात अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ अति जाड माणसात किंवा अति कृश व्यक्तीत मांसधात्वाग्नि आणि मेदोधात्वाग्नि बिघडलेला असतो.

प्राकृत ( normal ) अग्नि या आहराचे योग्य प्रकारे पचन करतो. परंतू प्रकृतीनुसार अग्निवर थोडाफार फरक होत असतो. उदाहरणार्थ वात प्रकृतीच्या अग्निवर थोडाफार फरक विषम होतो. म्हणजे काहीवेळा अयोग्य आहाराचेही पचन होते तर कधी योग्य आहाराही नीट पचवला जात नाही. म्हणजेच अन्नपचनाचे कार्य विषम असते. पित्तामुळे अग्नि तीक्ष्ण होतो. तीक्ष्णाग्नि आहाराचे पचन लवकर करतो. कफामुळे अग्नि मंद होतो. त्यामुळे घेतलेला आहार उशिराने पचतो.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.