या जगातील प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही गुणधर्म असतात. आपण शरीर पोषणासाठी जे अन्नपदार्थ घेतो त्यामध्येही औषधी गुणधर्म असतात तसेच काही दोष असतात. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार, आपल्याला असणा-या आजारांनुसार ते आपल्याला चालतात कि नाही हे आपण ठरवायला हवे.

वेगवेगळ्या आहारातील पदार्थांचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगता येतील.


धान्ये :

 • १) गहू : गहू हे गोड रसाचे, पचायला थोडे जड, थंड गुणाचे, स्निग्धता असलेले आहेत. वात आणि पित्ताचा नाश करणारे असून मलमूत्राला शरीराबाहेर काढायला मदत करणारे, शुक्रवर्धक, बलदायक, मोडलेली हाडे जोडणारे आणि आयुष्यवर्धक आहेत.
 • २) तांदूळ : तांदूळाच्या असंख्य जाती उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे गुणधर्म काही ना काही प्रमाणात वेगवेगळे आहेत. साधारणपणे तांदूळ जेवढा गोड आणि सुवासिक असतो तेवढा तो पचायला जड असतो. तांदूळाचे दोन मुख्य आणि चांगले प्रकार व त्यांचे गुणधर्म खालीलप्रमाणे –
  • अ) साठेसाळ : साठ दिवसात जो तांदूळ पिकतो त्याला साठेसाळ म्हणतात. सर्व तांदूळात हा श्रेष्ठ आहे. पचायला थोडा जड, थंड, स्निग्ध गुणाचा, गोड रसाचा, तिन्ही दोषांचा नाश करणारा, मळाला थोडेसे घट्ट करणारा आहे.
  • आ) तांबडी साळ : लालसर रंगाचा तांदूळ किंचित तुरट रसाचा, पचल्यावर गोड रस तयार होणारा, पचायला हलका, स्निग्ध, थंड गुणाचा, मूत्राचे प्रमाण वाढविणारा, शुक्रवर्धक, पथ्यकारक, तहान कमी करणारा, त्रिदोषनाशक आहे.
 • ३) जव : म्हणजे बार्ली. गोड रसाचे, पचायला जड, शरीरात कोरडेपणा आणणारे, मळाचे प्रमाण वाढविणारे, थंड, वात दोष वाढविणारे, शुक्रवर्धक, बलदायक, कफ-पित्तनाशक, चरबीचा नाश करणारे, सर्दी – दमा – खोकला – त्वचारोग यांचा नाश करणारे आहे.
 • ४) ज्वारी : गोड तुरट रसाची, थंड, किंचित शुक्रवर्धक, शरीरात कोरडेपणा आणणारी, पचायला हलकी, रक्तविकार – कफ – पित्तनाशक आहे. लघवीचे प्रमाण वाढविणारी आहे.


डाळी :

 • १) मूग : मूग हे गोड तुरट रसाचे, पचल्यावर तिखट, थंड, पचायला हलके, शरीरात हलकेपणा आणणारे, मळ घट्ट करणारे, पोटात थोड्याफार प्रमाणात गँसेस वाढविणारे, कफाचे रोग – चरबी – रक्तपित्त नाशक आहेत. सगळ्या डाळीत त्यातल्या त्यात बरी अशी ही मूग डाळ. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीसारखी.
 • २) हरभरा : गोड तुरट रसाचा, शरीरात हलकेपणा आणणारा, थंड गुणाचा आणि वातुळ आहे.
 • ३) कुळीथ : कुळीथ म्हणजे हुलगे होय. कुळीथ तुरट रसाचे, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, कफ आणि वाताचा नाश करणारे, रक्त आणि पित्ताला बिघडविणारे आहेत. मूळव्याध, दमा, मूतखडा, खोकला यात उपयुक्त आहेत.
 • ४) तूर –: तुरट गोड रसाचे, कोरडेपणा आणणारे, थम्ड, मळाला घट्ट करणारे, वातवर्धक, शरीरवर्ण उत्तम करणारे, पित्त – कफ – रक्तविकार दूर करणारे आहेत.
 • ५) मसूर : पचल्यावर गोड रस तयार करणारे मसूर थंड, शरीरात कोरडेपणा आणणारे, वातकारक, कफ- पित्त- रक्तविकार, ताप यांचा नाश करणारे आहेत.
 • ६) उडीद : पचायला जड, गोड रसाचे, स्निग्धता असलेले, रुची आणणारे, वातनाशक, बलदायक, शुक्रवर्धक, मल-मूत्र भेदक, कफ-पित्त वाढविणारे, मेद वाढविणारे, अर्दित (चेह-याचा लकवा) – दमा दूर करणारे आहेत.


भाज्या :

 • १) दुधीभोपळा : गोड रसाचा, पचल्यावर गोड, पचायला हलका, शरीरात हलकेपणा निर्माण करणारा, शरीरात कोरडेपणा आणणारा, ग्रहणी आणि मूळव्याधीत उपयुक्त आहे.
 • २) कारले : कडू, किंचित तिखट रसाचे, भूक वाढविणारे, वातकारक आहे. ताप – पित्त – कफ – जंत – रक्तविकार यांचा नाश करणारे आहे.
 • ३) घोसाळी : स्निग्ध गुणाची आणि रक्तपित्त आणि वात यांचा नाश करणारी आहेत.
 • ४) दोडका : गोड रसाचा, थंड, भूक वाढविणारा, कफ आणि वात वाढविणारा, पित्त – दमा –ताप – खोकला – जंत यांचा नाश करणारा आहे.
 • ५) पडवळ : पाचक, हॄदयाला हितकारक, शुक्रवर्धक, पचायला हलके, भूक वाढविणारे,स्निग्ध, खोकला – रक्तविकार – ताप – जंत – तिन्ही वाढलेले दोष यांचा नाश करणारे आहेत.
 • ६) तोंडली : गोड रसाची, थंड, पचायला जड, पोटात गँसेस करणारी, पित्त – रक्तविकार – वात दूर करणारी आहे.
 • ७) सुरण : रुचीकारक, भूक वाढविणारे, पचायला हलके, कफनाशक, मूळव्याधीत उत्तम आहे.


पालेभाज्या :

 • १) पालक : थंड, वात – कफ वाढविणारा, शौचाला साफ करणारा, पचायला जड, मद – दमा – रक्तविकार – कफ यांचा नाश करणारा आहे.
 • २) चाकवत : स्वादिष्ट, क्षारयुक्त, पचल्यावर तिखट, भूक वाढविणारे, पाचक, पचायला हलके, शुक्रवर्धक, बलदायक, रक्तपित्त – मूळव्याध – जंत – त्रिदोष यांचे नस्शक आहे.
 • ३) काटेमाठ : पचायला हलके, शरीरात कोरडेपणा आणणारे, भूक वाढविणारे, रुची निर्माण करणारे, पचनविकार – ग्रहणी – मूळव्याध – वाताचे रोग यांचा नाश करणारे आहे.
 • ४) आंबटचुका : अत्यंत आंबट रसाचे, वातनाशक, कफ – पित्त वाढविणारे, रुची निर्माण करणारे, पचनविकार – ग्रहणी – मूळव्याध – वाताचे रोग यांचा नाश करणारे आहे.
 • ५) मुळा : कोवळा मूळा त्रिदोषनाशक, पचायला हलका, उष्ण गुणाचा, खोकला – दमा – क्षय – जखमा – नेत्ररोग – कंठरोग – आवाज बसणे – पचनशक्ती कमी होणे – सर्दी यांचा नाश करणारा आहे. जुना मुळा (कोवळा नसलेला) मात्र तिखट रसाचा, उष्ण, पचायला जड आणि त्रिदोष बिघडविणारा आहे.


दूग्धजन्य पदार्थ :

 • १) दूध : दूध हे गोड रसाचे, पचल्यावर गोड रस निर्माण करणारे, स्निग्ध, थंड गुणाचे, पचायला थोडे जड, शरीरातील सर्व धातूंना पोषक, शुक्रवर्धक, वात – पित्त कमी करणारे, कफ वाढविणारे आहे. गाईचे दूध रसायन (सर्व धातूंना पोषक), बुद्धी वाढविणारे, बलदायक, अंगावरचे दूध वाढविणारे (स्तन्यवर्धक), सारक आहे. थकवा, चक्कर, दमा खोकला, अतितहान, अतिभूक, लघवीच्या तक्रारी, रक्तपित्त यांचा नाश करणारे आहे.
 • २) दही : दही हे आंबट रसाचे, पचल्यावर आंबट, पचायला जड, उष्ण गुणाचे, वातनाशक आहे. दही मेद (चरबी), शुक्र, बल, कफ, पित्त, रक्त, भूक आणि अंगावरची सूज यांना वाढविते. तोंडाला चव नसणे, हिवताप, सर्दी (पीनस), लघवीला कमी होणे यात उपयुक्त आहे. दही सतत, वारंवार खाऊ नये. रात्री दही खाऊ नये. अर्धवट विरजलेले दही खाऊ नये. तापविलेले दही खाणे नेहेमी टाळावे.
 • ३) ताक : ताक हे किंचित आंबट तुरट, पचायला हलके, वातनाशक, कफनाशक, भूक वाढविणारे आहे. सूज, जलोदर, मूळव्याध, संग्रहणी, लघवीचे विकार, पांथरी (स्प्लीनोमेगँली), वायुगोळा (गुल्म), विषविकार आणि तूप जास्त खाण्याने होणारे आजार यात उपयुक्त आहे.
 • ४) लोणी : लोणी हे थंड गुणाचे, शुक्रवर्धक, वर्ण चांगला करणारे, बलदायक आहे. वात – पित्त नाशक, रक्तपित्त – क्षय – मूळव्याध – खोकला यात उपयुक्त आहे. मात्र मेद अधिक असणारे, कोलेस्ट्रेरॉल अधिक असलेले यांनी जपूनच खावे.
 • ५) तूप : सर्व स्निग्ध पदार्थामध्ये उत्तम असणारे तूप थंड गुणाचे, आयुष्यवर्धक, बुद्धी – मेधा – स्मरणशक्ती वाढविणारे, बल – शुक्रवर्धक, भूक वाढविणारे, डोळ्यांना हितकारक, बाल – वृद्धांना हितकारक, सुकुमारता आणणारे आहे. क्षय – जखमा – थकलेला मनुष्य यांना उत्तम आहे. वात – पित्त – विषविकार – उन्माद – धातूक्षय – हाडी ताप यांचा नाश करणारे आहे.


मसाले व इतर :

 • १) कांदा : तिखट रसाचा कांदा पचल्यावरही तिखट रस निर्माण करतो. उष्ण गुण असलेला कांदा पचायला जड, स्निग्ध, रुची उत्पन्न करणारा आहे. भूक वाढविणारा , शुक्रवर्धक, हॄदयाला हितकारक कांदा कफ वाढवितो आणि किंचित कफही वाढवितो. मूळव्याधीवर उत्तम आहे. पोल्टिस बांधाण्यासाठी उपयोगी आहे.
 • २) लसूण : फारच तीक्ष्ण – उष्ण गुणाचा लसूण तिखट रसाचा आणि पचल्यावरही तिखट रस निर्माण करणारा आहे. पचायला जड, शुक्रवर्धक, हॄदयाला हितकारक, भूक वाढविणारा आहे. रक्त आणि पित्त बिघडविणारा आहे. त्वचाविकार – पांढरे कोड – मूळव्याध – जंत – वात – कफ – खोकला – दमा – सर्दी यांचा नाश करणारा आहे.
 • ३) धणे : तुरट रसाचे धणे स्निग्ध गुणाचे, लघवीचे प्रमाण वाढविणारे, पचायला हलके, उष्ण गुणाचे, भूक वाढविणारे, पाचक आहेत. ताप – आग – तहान – उलटी – दमा – खोकला – जंत – कृशपणा यांचा नाश करणारे आहेत.
 • ४) जिरे : तिखट चवीचे उष्ण गुणाचे, शरीरात कोरडेपणा आणणारे, पचायला हलके, भूक वाढविणारे, कफ – वात यांचा नाश करणारे ज्रे पित्त वाढवितात. पाचक, गर्भाशय सुद्ध करणारे, ताप – गँसेस – उलट्या – जुलाब यांचा नाश करते.
 • ५) मिरे : तिखट कडू रसाचे मिरे पचल्यावर तिखट रस निर्माण करतात. तीक्ष्ण, उष्ण, शरीरात कोरडेपणा निर्माण करणारे मिरे कफ – वात नाशक, पित्तवर्धक आहेत. दमा, खोकला. जंत, पोटदुखी यात उपयुक्त आहेत.


फळे :

 • १) द्राक्षे : गोड तुरट रसाची द्रक्षे पचल्यावर गोड रस निर्माण करणारी आहेत. थंड, स्निग्ध, पचायला जड असलेली द्रक्षे शुक्रवर्धक, सारक, लघवीचे प्रमाण वाढविणारी, वात – पित्त – रक्तपित्त – तोंडाची कडू चव – अतितहान – खोकला – दमा – क्षय – आवाज बसणे – थकवा यांचा नाश करतात. आंबट द्रक्षे मात्र कफ आणि पित्त वाढवितात.
 • २) आंबा :
  • अ) कोवळा आंबा (कैरी) : वात पित्त वर्धक, रक्तपित्त वाढविणारा आहे.
  • आ) बाढाळलेला : कफ पित्त वर्धक
  • इ) पिकलेला : गोड, किंचित आंबट, पचायला जड, वातशामक, कफ – शुक्र वर्धक, बलदायक, हॄदयाला हितकारक आहे.
 • ३) सफरचंद : गोड रसाचे, पचल्यावरही गोड रस निर्माण करणारे, पौष्टिक, धातूंना पोषक, पचायला जड, थंड, कफवर्धक, रुची निर्माण करणारे, शुक्रवर्धक, हॄदय – मस्तिष्क – यकृत – आमाशक यांना शक्ती देणारे आहे.
 • ४) केळी : गोड रसाची, थंड, पचायला जड, कफ – शुक्र वर्धक, स्निग्ध गुणाची आहेत. पित्त व रक्त शुद्ध करणारी आहेत. आग – जखमा – क्षय – तहान – नेत्ररोग यांचा नाश करणारी आहेत.
 • ५) जांभूळ : तुरट रसाचे, पचायला जड, थंड, भरपूर वात वाढविणारे, मल – मूत्र – वात यांना अडवून धरणारी, घशाला वाईट, कफ – पित्तनाशक आहेत.
 • ६) डाळिंब : आंबट रसाचे डाळिंब कफ वातशामक, किंचित उष्ण असूनही पित्त वाढवित नाही. गोड डाळिंब पित्तासह इतरही दोषांचा नाश करते. डाळिंब हे हॄदयाला हितकर, पचायला हलके, रुची वाढविणारे, भूक वाढविणारे आहे.
 • ७) आवळा : आंबट रसाच्या आवळ्यात खारट रस सोडून सर्व इतर पाच रस (गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट) असतात. पचायला हलके, भूक वाढविणारे, पाचक, बुद्धीवर्धक, तारूण्य टिकवणारे, थंड, आयुष्यवर्धक, शक्तीदायक आहे. कफ – पित्ताचे आजार, त्वचारोग, आवाज बसणे, हाडी ताप, डोक्याचे रोग, डोळ्यांचे रोग, कावीळ, सूज, जंत, दमा, खोकला या रोगात उपयुक्त आहे.


इक्षु वर्ग :

 • १) ऊस : चावून चावून खाल्लेला ऊस पचायला जड, स्निग्ध, पौष्टिक, कफ वाढविणारा, लघवीचे प्रमाण वाढविणारा, शुक्रवर्धक, थंड, सारक, गोड रसाचा आहे. यंत्राच्या (चरकाच्या) सहाय्याने काढलेला ऊसाचा रस मात्र ऊसाचे मूळ, पेर, कीड असलेला भाग यासकट पिळून काढलेला असल्याने, मळ मिसळल्यामुळे व काही वेळ हवेत उघडा राहिल्यामुळे विकृत होतो. तो पचायला अधिक जड, मलावरोधक आणि जळजळ निर्माण करणारा आहे.
 • २) गुळ : ऊसापासून तयार केलेला स्वच्छ गुळ किंचित कफवर्धक,, मलमूत्रांची शुद्धी करणारा आहे. मलीन गुळ रक्त – मांस – मेद – कफ यांना वाढवितो. विशेषतः पोटातील जंतांना कारणीभूत होतो. जुना गुळ रुची देणारा आणि पथ्यकर आहे. नवा गुळ मात्र कफ वाढवितो आणि भूक निर्माण करतो. दमा, खोकला, जंत तयार करतो. आल्याच्या रसातून गुळ घेतल्याने कफ नष्ट होतो तर सुंठीबरोबर घेतल्याने वात कमी होतो.
 • ३) साखर : साखर ही गोड रसाची, थंड, शुक्रवर्धक, रक्तपित्तनाशक, आग – तहान – उलटी – रक्तविकार दूर करणारी आहे. डोळ्यांना पोषक आहे. वातनाशक आहे. खडीसाखर ही गोड, वीर्यवर्धक, डोळ्यांना हितकर, पोषण करणारी, सातही धातूंना पोषक, थंड, वात पित्तनाशक, स्निग्ध गुणाची, बलदायक आणि उलटीचा नाश करणारी आहे. मधापासून तयार झालेली साखर कफ आणि पित्तनाशक, शरीरात कोरडेपणा आणणारी, तुरट गोड रसाची, थंड आहे. उलटी – जुलाब – तहान – आग – रक्तविकार यांत उपयुक्त आहे.


मध :

मध हा थंड, पचायला हलका, गोड रसाचा, शरीरत कोरडेपणा आणणारा, डोळ्यांना हितकारक, भूक वाढविणारा, आवाज उत्तम करणारा, जखमा स्वच्छ करणारा आणि भरून आणणारा, सुरूवातीला गोड आणि नंतर तुरट चव लागणारा, उत्साहवर्धक, शरीराचा रंग उत्तम करणारा, वीर्यवर्धक, स्मरणशक्तीवर्धक, रूचीदायक आणि थोडासा वात वाढविणारा, कफ – पित्तनाशक आहे. त्वचारोग, मूळव्याध, खोकला, पित्ताचे रोग, रक्तविकार, प्रमेह, जंत, मेद (चरबी), तहान, उलटी, दमा, उचकी, जुलाब, आग, जखमा, क्षयरोग यांचा नाश करणारा आहे.

आयुर्वेदाने मधमाशांच्या वेगवेगळ्या आठ प्रकारांनुसार मधाचे आठ प्रकार वर्णन केलेले आहेत आणि या आठ प्रकारांचे गुणधर्मही वर्णन केलेले आहेत.

नवीन मध हा पौष्टिक, थोडासा कफनाशक, सारक असतो तर जुना मध शरीरात कोरडेपणा आणणारा, चरबी कमी करणारा असतो.

मध इतका गुणकरी असला तरी उष्ण विकारांमध्ये, उष्ण ॠतूत, उष्ण पदार्थाबरोबर किंवा गरम करून उपयोग केला तर अपाय करतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.