आजकाल प्रत्येकाच्या घरात वॉटर प्युरिफायर आलेले आहेत. किमानपक्षी वॉटर फिल्टर तरी प्रत्येकाकडे असते. पूर्वीच्या काळी मात्र घरोघरी माठ असायचा आणि तो माठ ठेवण्यासाठी तीन पायांची तीवई असायची. या तीन पायांच्या तीवईवर पूर्ण माठाचा भार तोललेला असायचा.

याप्रमाणेच हा शरीररूपी माठ ज्या तीन पायांच्या तीवईवर तोललेला आहे ते सहाय्यक पाय म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य होय. मूळ सिद्धांतानुसार शरीराला धारण करणारे तीन स्तंभ ( खांब ) म्हणजे वात , पित्त आणि कफ हे तीन दोष. या दोषांवर सर्व शरीरक्रिया, आरोग्य अवलंबून आहे. या तीन स्तंभांना, दोषांना सहाय्य करणारे तीन उपस्तंभ, खांब म्हणजे आहार – निद्रा – ब्रह्मचर्य हे त्रयोपस्तंभ होय.

आहार

अन्न हे प्राण धारण करणा-यांचा प्राण आहे. म्हणुन या सृष्टीतील सर्व सजीव अन्नामागे धावत असतात. शरीराचे बल, वर्ण, पुष्टी, बुद्धी आणि सुख अन्नावरच अवलंबून आहे.

या अन्नावरच सगळे जीवन अवलंबून आहे. म्हणुन आहारात काय घ्यावे, कसे घ्यावे, किती घ्यावे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आयुर्वेदानुसार अशा पदार्थांचा नेहमी आहारात उपयोग करावा कि जे शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवेल आणि रोग उत्पन्न होऊ देणार नाही.

गरम, स्निग्ध, योग्य मात्रेत, पहिले खाल्लेले अन्न पचल्यावर, मनाला आवडेल अशा ठिकाणी, सर्व योग्य सामग्रीसह, फार भरभर नाही पण फार हळूही नाही असे, न हसता बोलता, जेवणाकडे पूर्ण लक्ष देवून, आपल्याला काय सोसेल ? याचा विचार करून अन्न खावे. योग्य मात्रेत म्हणजे काय तर जे अन्न पचतांना कुठलाही त्रास न होता सुखाने पचते ते. कमी मात्रेत घेतलेला आणि जास्त मात्रेत घेतलेला आहार असे दोन्ही प्रकार रोग उत्पन्न करतात.

आपल्या पोटाचे तीन भाग कल्पून एक भाग घन पदार्थ, एक भाग द्रव पदार्थ असा आहार घ्यावा. तिसरा भाग हा पचनाला आवश्यक असणा-या वात, पित्त , कफ दोषांच्या चलनवलनासाठी ठेवावा.

आजकाल नोकरीमध्ये बदलत्या पाळ्यांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे जेवणाच्या वेळाही वारंवार बदलतात. रात्रपाळीचे लोक घरी आल्यावर आधी जेवतात आणि नंतर लगेच झोपतात. त्यामुळे त्यांच्यात पचनाच्या तक्रारी उद्भवतात. म्हणून रात्रपाळीच्या लोकांनी आधी झोप घेऊन नंतर जेवण केले तर त्यांचे त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होईल.

आपापले विषय ग्रहण करण्याचे कार्य करीत असतांना इंद्रिये आणि मन थकून आपापल्या विषयांपासून निवृत्त होतात तेव्हा माणूस झोपतो आणि जेव्हा केवळ इंद्रिये विषयापासून मुक्त होतात आणि मन मात्र कार्य करीत असते तेव्हा माणूस स्वप्ने बघतो.

निद्रा

झोप ही शरीराचे धारण-पोषण करणारी आहे. योग्य प्रमाणात निद्रा घेतली तर सुखकर होते, शरीराची पुष्टी करते, शरीराचे बल वाढविते, मैथुन-शक्ती वाढविते, ज्ञान देते ( विश्रांतीनंतर मन, इंद्रिये ताजीतवानी झाल्याने विषयांचे ग्रहण अधिक योग्य होते.), आयुष्य राखते. पण निद्रा मिळाली नाही तर शरीर कृश, दूर्बल होते. ज्ञान नीट होत नाही.

दूपारी, दिवसा झोपू नये. कारण दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त दोष प्रकूपित होतात. उन्हाळ्यात ( ग्रीष्म ऋतूत ) मात्र वातावरणात कोरडेपणा असल्याने शरीरार वात साठायला लागतो आणि रात्रही छोटी असते त्यामुळे फक्त उन्हाळ्यात दुपारी झोपण्याची आयुर्वेद परवानगी देतो, पण जेवणानंतर कमीतकमी एक मूहूर्तानंतर ( १ मूहूर्त = ४८ मिनिटे ).

शारीरिक कष्ट, मैथुन, प्रवास, व्यायाम यामूळे थकलेले, अजीर्ण (अपचन) झालेले, वृद्ध, बालक, दुर्बळ, तहान-जुलाब-वेदना हे त्रास असणारे, दमा-उचकीचे रोगी, कृश व्यक्ती, अपघात झालेले, रात्री जागरण झालेले, भय-क्रोध-शोकग्रस्त यांनी दिवसा झोपण्यास हरकत नाही. पण जे मेदोरोगाने – स्थूलपणाने त्रस्त आहेत, तेल-तूप जास्त खातात, कफ प्रकृती असलेले, कंठरोगी, विषसेवन केलेले यांनी मात्र दिवसा अजिबात झोपू नये. जर दिवसा झोप घ्यावीशी वाटली तर बसून, आडवे न होता झोप घ्यावी. मात्र कंठाचे रोग असलेले व विषसेवन केलेले यांनी तर अजिबातच झोपू नये – बसूनही नाही आणि आडवे पडूनही नाही.

स्वस्थ माणसाने रात्री जागरण झालेले असेल तर दिवसा झोप घ्यावी. पण ती जेवण घेण्यापूर्वी आणि जेवढा वेळ जागरण झालेले असेल त्याच्या निम्म्या वेळच झोप घ्यावी. म्हणजे आजारांना निमंत्रण मिळणार नाही.

ब्रह्मचर्य

तीन उपस्तंभापैकी तिसरा उपस्तंभ ‘ब्रह्मचर्य” आहे. ब्रह्मचर्य म्हणजे शुक्राचे रक्षण करणे. आहाराचा सारभाग म्हणजे शुक्र. शुक्राचे रक्षण केले म्हणजे शरीराचेही रक्षण होते.

घुबड दिवसा पाहू शकत नाही, कावळा रात्री पाहू शकत नाही. परंतू कामवासनेने अंध झालेला मनुष्य दिवसाही पाहू शकत नाही आणि रात्रीही. कारण त्याला कामवासनेशिवाय इतर काहीही सूचत नाही. महाभारतातही म्हटलेलेच आहे कि झोपून निद्रा जिंकता येत नाही, कामोपभोगाने स्त्री, इंधनाने अग्नी आणि मद्यपानाने मद्य जिंकता येत नाही.

सामान्य लोकांसाठी गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्याचे पालन करण्यास आयुर्वेद सांगतो.

ब्रह्मचर्याचे आठ (८) प्रकार आहेत. त्याला अष्टांग ब्रह्मचर्य म्हणतात.

  1. स्मरण
  2. गुणगान
  3. स्त्री-पुरुष परस्परांनी क्रिडा करणे
  4. कामूक दृष्टीने पाहणे
  5. एकांतस्थळी स्त्री-पुरुषांनी गप्पागोष्टी करणे
  6. मैथुनाचा संकल्प करणे
  7. मैथुनाकरीता प्रयत्न करणे
  8. प्रत्यक्ष मैथुन (संभोग) करणे

या आठ प्रकारांना मैथुन अशी संज्ञा आहे आणि याच्या विपरीत ते अष्टांग ब्रह्मचर्य होय. हे जो पाळतो तो खरा ब्रह्मचारी.

विवाहानंतर गृहस्थाश्रमात हे पूर्णपणे अपेक्षित नसले तरी काही नितीनियम पाळून ब्रह्मचर्याचे पालन कोणालाही करता येण्यासारखे आहे.

विवाहानंतर पुरुषाने पौर्णिमा, अमावस्या वगळून सुखप्राप्तीसाठी स्वपत्नीसोबत रतिसुख घ्यावे. हा उपभोग संतती प्राप्तीसाठी आहे. थोडक्यात संतानोत्पत्तीसाठी घेतलेले रतिसुख म्हणजे गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्य असे म्हणता येईल.

गर्भधारणेनंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत आणि प्रसूतीनंतर बाळाला दात आल्यानंतर पत्नीसोबत समागम केल्यास तो अधर्म ठरत नाही. अप्रसन्न, रोगी, गर्भवती, व्रत करणारी, मासिक पाळी सूरू असणारी व मैथुनाची इच्छा नसणा-या पत्नीसोबतही पुरुषाने समागमासाठी जबरदस्ती करू नये. पंचवीस वर्षाच्या आतील पुरुषाने आणि सोळा वर्षाच्या आतील स्त्रीने समागम करू नये. परस्त्री, परपुरुषाची इच्छा धरणारी स्त्री, अन्य योनी ( मनुष्येतर सर्व प्राणी), अयोनी (योनी सोडून अन्य ठिकाणी मैथुन – गुदमथुन, मुखमैथुन इ.) मैथुन करू नये. जेवणानंतर लगेच, उपाशीपोटी, शरीर वेड्यावाकड्या स्थितीत असतांना, शौच-मूत्र यांचे वेग आलेले असतांना, व्यायामाने दमलेले असतांना, एकांतात नसतांना मैथुन करू नये.

याप्रकारे ब्रह्मचर्य पाळून मैथुन सेवन केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते, शरीर बलवान होते, पुष्ट होते, म्हातारपण लवकर येत नाही. ब्रह्मचर्याचे पालन न करता अत्यधिक प्रमाणात उपभोग घेतला असता ताप, दमा, खोकला, पाण्डूरोग, क्षयरोग यांसारखे व्याधी होतात आणि मृत्यूही येऊ शकतो.

सर्वच इंद्रियांनी आपापल्या विषयांचे सेवन अजिबात न करणे, अति करणे किंवा चूकीचे करणे रोगनिर्मितीला कारण होते. म्हणूनच इंद्रियांचे दमन करू नये आणि त्यांच्या अतिस्वाधीनही होऊ नये हेच खरे. ( "न पीडयेदिन्द्रियाणि न चैतान्यतिलालयेत् ।")

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.